कोलकाता येथील लोकल ट्रेनमध्ये प्रेमी युगूलाशी सहप्रवाशांनी असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीने फेसबुकवर घटनेचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी तरुणीने कोलकातामधील रेल्वे पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

कोलकाता येथे काही महिन्यांपूर्वी मेट्रोमध्ये मिठी मारणाऱ्या युगूलाला सहप्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.  यानंतर आता कोलकाता येथील लोकल ट्रेनमध्ये प्रेमी युगूलाला सहप्रवाशांनी शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. कोलकाता येथे राहणाऱ्या २८ वर्षांच्या तरुणाने आणि २४ वर्षांच्या तरुणीने शनिवारी रात्री सियालदाह स्टेशनवरुन लोकल ट्रेन पकडली. दोघेही खासगी कंपनीत कामाला आहेत. ट्रेनमध्ये एकत्र बसता यावे म्हणून त्या दोघांनी एका प्रवाशाला बाजूला सरकून बसायला सांगितले. मात्र, त्या प्रवाशाने बाजूला सरकण्यास नकार दिला. मला पंख्याची हवा लागणार नाही, असे त्या पुरुष प्रवाशाचे म्हणणे होते. यावरुन त्यांच्यात वादही झाला. शेवटी ते युगूल मिळेल तितक्या जागेतच बसले.

काही वेळाने पुढील स्थानकावर त्या ट्रेनमध्ये आणखी काही प्रवासी चढले. यातील एकाने त्या प्रेमी युगूलाशी असभ्य वर्तन केले. तरुणीच्या जीन्स आणि टी- शर्टवरुनही त्याने शेरेबाजी केली. हा सर्व प्रकार त्या तरुणीने मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला. त्या प्रवाशांनी प्रेमी युगूलाला शिवीगाळ देखील केली. संबंधित तरुणीने संपूर्ण घटनाक्रम आणि व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला असून या प्रकरणी तिने पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे.