येत्या वर्षभरात राज्यातील सत्तेतून बाहेर पडू, या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे कालच्या मेळाव्यात जे काही बोलले त्या गोष्टी यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत. संपूर्ण पक्षाची हीच भावना आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधात दुरावा आल्याची बाब सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेना सध्या राज्यातील सत्तेत वाटेकरी असली तरी सरकार मात्र आमचे नसल्याची भावना यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता शिवसेना युती तोडण्याचे निर्णायक पाऊल उचलणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी गुरूवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहमदनगरच्या रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तेत शिवसेना विरोधक नसली तरी सत्तेची पहारेकरी आहे. या वर्षभरात शिवसेना सत्तेला लाथ मारू शकेल. त्यानंतर आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ. मात्र, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. सरकारमधून बाहेर पडण्याचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. अपेक्षित परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले होते.

याशिवाय, आदित्य यांनी राज्यातील शिक्षणव्यवस्थेच्या दुरावस्थेवरून भाजपला लक्ष्य केले. भाजपच्या काळात शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेक समस्या तशाच आहेत. अनेक विद्यार्थी मला भेटून त्यांच्या समस्या सांगतात. शिवसेना या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी शिवसेनेकडून सध्या एक शैक्षणिक अॅप्लिकेशन तयार करण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकेल, असे आदित्य यांनी सांगितले होते.