भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून आता भारताला अण्वस्त्राची पोकळ धमकी दिली जात आहे. काश्मीर मुद्याला अधिक चर्चेत आणण्यासाठी आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट आण्विक युद्धाची भाषा केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी काश्मीरसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे देखील म्हटले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यासंदर्भात अधिक बोलताना म्हटले की, काश्मीरच्या लोकांनी प्रत्येक शुक्रवारी रस्त्यांवर उतरले पाहिजे. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या बरोबर आहोत. यावेळी त्यांनी एकप्रकारे आण्विक युद्धाची धमकीही देत, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. पण अशा युद्धाने काहीच हाती लागणार नाही. जर युद्ध झालं तर दोन्ही देशांसह जगाचाही नायनाट होईल.

काश्मीर मुद्दा जगभरातील आमच्या सर्व दूतावासांकडून उचलला जाईल. खरंतर आम्ही चर्चेने हा मुद्दा सोडवू इच्छित होतो. मात्र आता पीओकेवर आम्ही संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहोत. काश्मीर मुद्यावर मुस्लिम राष्ट्र आमची साथ देतील. काश्मीरबद्दल भारताचे पंतप्रधान मोदींकडून मोठी चूक झाली आहे. आम्ही काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय केला आहे. शेवट्या श्वासापर्यंत आम्ही काश्मीरच्या लोकांबरोबर राहू असेही त्यांनी म्हंटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकादा काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय चर्चेचा विषय आहे व यात तिसऱ्या पक्षाने लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही सहमती दर्शवल्याने पाकिस्तानचा अधिकच तीळपापड झाला व संतप्त झालेल्या इम्रान खान यांनी थेट आण्विक युद्धाचीच भाषा केली.