पाकिस्तानच्या सार्वभौमत्व व एकतेचा आम्ही आदर करतो, त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास आमचा पाठिंबा नाही, असे अमेरिकी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानमधील अस्वस्थतेचा मुद्दा उपस्थित केला होता.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे धोरण पाकिस्तानच्या प्रादेशिक एकात्मतेला पाठिंबा देण्याचे असून, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास आमचा पाठिंबा नाही.

नैर्ऋत्य पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्याच्या मागण्या होत असून, तेथे पाकिस्तानी सुरक्षा दले मानवी अधिकारांचा भंग करीत आहेत, त्यावर अमेरिकेचे मत विचारण्यात आले होते. बलुचिस्तानवर अमेरिकेची भूमिका नेमकी काय आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर किरबी यांनी सांगितले, की  अमेरिकी सरकार पाकिस्तानची एकात्मता व अखंडतेचा आदर करते, त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास आमचा पाठिंबा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात असे सांगितले होते, की पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट व बलुचिस्तान या भागांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांनी भारताचे आभारही मानले आहेत.

आता रेडिओचे बलुच संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅप

नवी दिल्ली  : ऑल इंडिया रेडिओ लवकरच बलुच भाषिकांसाठी संकेतस्थळ (वेबसाइट) आणि मोबाइल अ‍ॅप सुरू करणार आहे. रेडिओवरून १९७४ पासून दररोज एक तास बलुच भाषिकांसाठी कार्यक्रम सादर केला जातो. तो पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातही ऐकता येतो. त्याच्या जोडीला आला संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बलुच भाषिकांचे प्रश्न जागतिक स्तरावर मांडण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाला उत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमधील दडपशाही जगासमोर मांडण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात व्यक्त केले होते. त्यानंतर या प्रयत्नांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी डीडी न्यूजने स्वित्र्झलडमधील जीनिव्हा येथे आश्रय घेतलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रहमदाग बुगटी यांची मुलाखत घेतली होती.   प्रसार भारतीचे जागतिक स्तरावर विस्ताराचे धोरण आहे. त्या अनुषंगाने बलुच संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप सुरू केल्याने फायदाच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.