सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ हा चित्रपट सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतरही गुजरातमधील मल्टिप्लेक्सनी या चित्रपटाचे स्क्रीनिंग करायला नकार दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे सर्वजणच घाबरले आहेत. कोणत्याही मल्टिप्लेक्स मालकाला स्वत:चे नुकसान करून घ्यायचे नाही. या सगळ्या वादात आम्ही स्वत:चे नुकसान का करुन घ्यायचे, असा सवाल गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनचे संचालक राकेश पटेल यांनी विचारला. त्यामुळे, आता गुजरातमधील केवळ सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ चित्रपट दाखवला जाणार आहे.

देशातील चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चित्रपटावर असलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी आपला निर्णय दिला. ‘पद्मावत’ चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना दणका दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने चित्रपटाच्या टीमला दिलासा मिळाला असला तरीही चित्रपटाला होत असलेला विरोध कायम आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे म्हणत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक राज्याची आहे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Padmaavat: अखेर दीपिकाची कंबर झाकून ‘घुमर’चे नवे व्हर्जन प्रदर्शित

दरम्यान, ‘पद्मावत’ची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकील हरिश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी साळवे यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली. साळवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर अनेकांचेच लक्ष करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कल्वी यांच्याकडे गेले. पण, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार ठरवू नये असे म्हणत कल्वी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कर्ता, कर्म आणि ‘करनी’