सेशल्स देशाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉर यांची द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर ६ विविध करारांवर दोघांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी फॉर यांनी बहुपक्षीय व्यावसाय़ीक करार तसेच सुरक्षा आणि संरक्षणासंबंधी मोदींच्या दुरदृष्टीची प्रशंसा केली. दरम्यान, सेशल्सच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून १० कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली.


गेल्या काही दिवसांपूर्वी सेशल्सकडून लष्करी तळ निर्माण करण्याबाबतचा भारताबरोबरचा करार तोडल्याने हा भारतासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात होते. सेशल्सच्या राष्ट्रपतींनी घोषणा केली होती की, या प्रकल्पावरील सर्व हेतू संपुष्टात आले असून सेशल्स पुढील वर्षापासून स्वतःच्या पैशातून लष्करी तळ उभारेल. मात्र, सेशल्सच्या समुद्रात होत असलेल्या चीनच्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या मदतीने नाविक तळ निर्माण करण्याच्या प्रस्तावावर सेशल्स तयार झाला आहे. त्यामुळे भारत आणि सेशल्सदरम्यान नाविक तळ निर्माण करण्याबाबत सोमवारी करार करण्यात आला.

सेशल्सच्या राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण असम्पशन बेटांवरील लष्करी तळ निर्माण करण्याबाबत सहमत आहोत. या प्रकल्पावर द्विपक्षीय चर्चा झाली असून आता आम्ही एकमेकांच्या हितांचा विचार करुन सोबत काम करणार आहोत असे फॉर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

हिंदी महासागरात सेशल्सच्या अधिकार क्षेत्रात भारताकडून उभारण्यात येणारा नाविक तळ भारतासाठीही महत्वाचा आहे. भारत आणि सेशल्स सामरिक सहकारी आहेत. लोकशाहीच्या मुळ सिद्धांतांचा आम्ही सन्मान करतो त्यामुळे हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा तसेच स्थिरता कायम राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.