ममतांचे पुनरागमन; भाजपचा चंचुप्रवेश, काँग्रेस-डावे आघाडीची पीछेहाट
शारदा चिट फंड घोटाळा, नारद स्टिंग ऑपरेशन आणि सत्तेत असल्याने ओढवणारी मतदारांची नाराजी असे विरोधात जाणारे मुद्दे गौण ठरवत पश्चिम बंगालमधील मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २११ जागांसह विजयी केले. त्यामुळे ममतांना सलग दुसऱ्या वेळी मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली आहे. २७ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ, असे ममतांनी जाहीर केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भबिनपूर मतदारसंघातून २५ हजार ३०१ मतांनी विजय मिळवला.
शहरांमधील बहुतेक सर्व जागा तृणमुल काँग्रेसने जिंकल्या आहेत.काँग्रेससोबत युती करताना गेल्या वेळी तृणमुल काँग्रेसला १८४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात वाढच झाली. डावे पक्ष- काँग्रेस आघाडीला त्यांना रोखता आले नाही. या आघाडीचे शिल्पकार मानले गेलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुर्यकांत मिश्रा नारायण गढ मतदारसंघातून पराभूत झाले. हा मोठा धक्का आहे.
राज्यात विधानसभेच्या २९४ जागांसाठी ४ एप्रिलपासून सहा टप्प्यांत मतदान झाले होते. २०११ साली झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसने ‘मां, माटी और मानुष’ अशी मतदारांना भावनिक साद घालत काँग्रेसच्या बरोबरीने राज्यातील ३४ वर्षांची डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आणली होती. या वेळी मात्र राज्यात काँग्रेसने तृणमूलशी फारकत घेत डाव्या पक्षांशी सलगी केली होती. तृणमूलपुढे त्यांचेच मुख्य आव्हान होते. मात्र डाव्यांसह काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निष्प्रभ ठरवत ममतांनी राज्यात सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले आहे.
भारतीय जनता पक्षाला विशेष प्रभाव पाडता आला नाही. पूर्वी त्यांची एक जागा होती. त्यात दोन जागांची भर पाडता आली. भाजप प्रदेशाध्यक्ष घोष विजयी झाले. गोरखा जनमुक्ती मोर्चाला ३ जागा मिळाल्या. पूर्व मिदनापूर जिल्ह्य़ातील नंदिग्राम येथे जमीन अधिग्रहणविरोधात झालेल्या आंदोलनामुळे तृणमूलला २०११ सालच्या निवडणुकीत मोठा हात दिला होता. हा मतदारसंघ राखण्यात तृणमूलला यश लाभले आहे.

महत्त्वाच्या लढती ..
* तृणमूलचे खासदार सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डाव्या आघाडीचे उमेदवार अब्दुल कबीर शेख यांचा ८१,२३० इतक्या घसघशीत मतफरकाने पराभव केला आहे.
* राज्याचे अर्थ आणि उद्योगमंत्री अमित मित्रा यांनी प्रतिस्पर्धी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार असिम कुमार दासगुप्ता यांचा २१,२०० मतांनी पराभव करत खारदाह मतदारसंघातील आपले
वर्चस्व राखले आहे.
* हावडा उत्तर मतदारसंघातून तृणमूलच्या तिकिटावर लढणारे बंगालच्या क्रिकेट संघाचे माजी कप्तान लक्ष्मी रतन शुक्ला यांनी काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार पाठक यांचा २६,९५९ मतांनी पराभव केला.
* विधानसभा अध्यक्ष आणि तृणमूलचे नेते बिमान बॅनर्जी यांनी बारुईपूर पश्चिम मतदारसंघात यश मिळवले आहे.

कल चाचण्या खऱ्या ठरल्या ..
शारदा चिट फंड घोटाळा, नारद स्टिंग ऑपरेशन आणि सत्तेत असल्याने ओढवणारी मतदारांची नाराजी (अँटि-इन्कम्बन्सी फॅक्टर) असे अनेक मुद्दे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जात होते, पण तरीही त्यांनाच बहुमत मिळेल असा अंदाज अनेक मतदानोत्तर कौल चाचण्यांमधून व्यक्त केला गेला होता. ते अंदाज खरे ठरले आहेत.

मतमोजणी यंत्रणा आणि सुरक्षा ..
राज्यातील ३९४ केंद्रांवर मतमोजणी होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाचे २०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्रीय दलांच्या ७८ कंपन्या तैनात केल्या आहेत. त्यांना स्थानिक पोलीस मदत करत असून बहुतेक मतमोजणी केंद्रांच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू होते. केंद्राच्या १०० मीटर परिघात मतमोजणीशी संबंधित व्यक्तींना सोडून कोणालाही प्रवेश नव्हता.