नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूलचा ‘देशनायक दिवस’, तर केंद्राचा ‘पराक्रम दिन’

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.

तृणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते. ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.

या कार्यक्रमापूर्वी ममता यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, ‘‘भाजपने यापूर्वी कधीही नेतांजींची जयंती साजरी केली नव्हती. आम्ही दरवर्षी नेताजींची जयंती साजरी करतो. यंदा ती मोठ्या प्रमाणावर साजरी करीत आहोत. निवडणूक आहे, म्हणून ती साजरी करीत नाही.’’ नेताजींचा वापरभाजप विधानसभा निवडणुकीसाठी करीत असल्याचा आरोपही ममता यांनी केला. तृणमूल काँग्रेसतर्फे कोलकात्यात सात किलोमीटर मिरवणूकही काढण्यात आली.

नेताजींचा जन्मदिवस देशप्रेम दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा आम्ही सर्वप्रथम केली. केंद्र सरकारने काय घोषणा केली हा त्याचा प्रश्न. नेताजींच्या जन्मदिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणे आवश्यक होते. परंतु त्यांना (भाजप)फक्त निवडणुकीआधी बंगालची आठवण होते. त्यांना बंगाल हा शब्दही व्यवस्थित उच्चारता येत नाही, असा टोलाही ममता यांनी भाजपला लगावला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संकल्पनेनुसार स्थापन करण्यात आलेला नियोजन आयोग केंद्र सरकारने मोडीत काढला अशी टीकाही ममता यांनी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला सुटी का दिली जात नाही असा सवाल करून त्या म्हणाल्या की, अनेकांना नेताजींची आठवण निवडणुकांशिवाय येत नाही. नेताजींना रवींद्रनाथ टागोर यांनी देशनायक संबोधले होते. त्यांचा जन्मदिन देशनायक दिन म्हणून आम्ही साजरा करीत आहोत.

नेताजींना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘नेताजी असते तर आजचा सामथ्र्यवान भारत पाहून त्यांना अभिमान वाटला असता. नियंत्रण रेषा ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत देश त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करीत आहे. नेताजींनी सामथ्र्यवान भारताचे स्वप्न पाहिले होते. आता देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले तर आपण जशास तसे उत्तर देत आहोत, असेही मोदी म्हणाले.

‘चार राजधान्या असाव्यात’

देशात चार राजधान्या असाव्यात आणि देशात विविध ठिकाणी संसदेचे अधिवेशन व्हावे, असे मत  ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे व्यक्त केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने सल्लामसलत न केल्याबद्दल टीका केली.

नेताजी असते तर आजचा सामथ्र्यवान भारत पाहून त्यांना अभिमान वाटला असता. नियंत्रण रेषा ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत देश त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करीत आहे.   – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नेताजींच्या संकल्पनेनुसार स्थापन केलेला नियोजन आयोग केंद्र सरकारने मोडीत का काढला? नेताजींचा जन्मदिवस देशनायक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आम्ही प्रथम केली. परंतु त्यांना (भाजप)फक्त निवडणुकीआधी बंगालची आठवण होते. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल