पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल सरकारवर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर बॅनर्जींनी पलटवार केला असून राहुल गांधी अजूनही बच्चा (लहान) आहेत, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जींनी राहुल गांधींची तुलना लहान मुलाशी केल्याने त्या महाआघाडीत सामील होणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी एका सभेत ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली होती. ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष यात आता फार फरक उरलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये फक्त ममता बॅनर्जी यांनाच बोलण्याचा अधिकार आहे. विरोधकांना बोलण्याचा अधिकारच नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांचे एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि त्यांच्या काळात पश्चिम बंगालचा विकास देखील झाला नाही. डाव्या पक्षांची सत्ता असतानाही लोकांना लक्ष्य केले जायचे आणि त्यांच्यात दहशत निर्माण केली जायचे. ममता बॅनर्जी सरकारच्या काळातही तेच सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर ममता बॅनर्जी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावत ममता बॅनर्जी म्हणाल्या, राहुल गांधी अजूनही बच्चा आहेत. मी त्यांच्या आरोपांवर काय बोलणार? किमान उत्पन्नासंदर्भात काँग्रेसच्या घोषणेवर आम्ही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यातील आरोप- प्रत्यारोप पाहता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस एकत्र येणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महाआघाडीत सर्व विरोधी पक्षांना सामील करुन घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा सुरू आहे.