ब्रिटिशांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी करून दोन्ही देशांना स्वातंत्र्य दिले तेव्हा सर्व संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिला. त्यानुसार जम्मू-काश्मीर संस्थानने दोन्ही देशांत विलीन न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या मदतीने जम्मू-काश्मीरवर हल्ला चढवला आणि पश्चिमेकडील बराचसा भाग काबीज केला. अशा परिस्थितीत २६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू-काश्मीरचे भारतात सामिलीकरण झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्षभराहून अधिक काळ युद्ध चालले आणि १ जानेवारी १९४९ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली. अखंड जम्मू-काश्मीर राज्याचे क्षेत्रफळ २,२२,२३६ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी त्या वेळी पाकिस्तानच्या ताब्यातील जो भाग सोडवायचा राहून गेला त्याला पाकव्याप्त काश्मीर म्हणतात. त्याचे क्षेत्रफळ ७८,११४ चौरस किलोमीटर आहे. जम्मू विभागातील काही भाग तसेच गिलगिट, हुंझा आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तान या प्रदेशाला आझाद काश्मीर म्हणते.

याशिवाय पाकिस्तानने मार्च १९६३ साली झालेल्या चीन-पाकिस्तान सीमा करारानुसार भारताचा जम्मू-काश्मीरमधील ५१८० चौरस किलोमीटरचा भूभाग परस्पर चीनला देऊन टाकला आहे. तसेच चीनने जम्मू-काश्मीरमधील अक्साई चीनचा ३७,५५५ चौरस किलोमीटर भाग बळकावला आहे. त्याला चीनव्याप्त काश्मीर म्हणतात.

भारताने नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्य केली नसली तरी प्रत्यक्षात दोन्ही देशांतील तीच सीमा (‘डी-फॅक्टो’ बॉर्डर) असल्यासारखी परिस्थिती आहे.

नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा..

राज्याच्या जम्मू भागात भारत आणि पाकिस्तान यांच्यात २२१ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तर छांबजवळून नियंत्रण रेषा सुरू होऊन ती उत्तरेला सियाचेन हिमनदी परिसरात ‘एनजे-९८४२’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिंदूवर संपते. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेची लांबी १००१ किलोमीटर आहे. तिचा २०५ किमी हिस्सा जम्मू भागात, ४६० किमी हिस्सा काश्मीर खोऱ्यात आणि ३३६ किमी हिस्सा लडाख व सियाचेन विभागात आहे. बांगलादेश मुक्तीसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धानंतर सिमला येथे ३ जुलै १९७२ रोजी शांतता करार झाला. त्या वेळी ही रेषा व्यवस्थित आखली गेली आणि तिला नियंत्रण रेषा (लाइन ऑफ कंट्रोल- एलओसी) असे नाव दिले गेले. तत्पूर्वी तिला ‘सीझफायर लाइन’ म्हणून ओळखले जात असे.

सियाचेन हिमनदी परिसरात १९८४ साली पाकिस्तानने भारताचा प्रदेश काबीज करण्याची तयारी चालवल्याची माहिती मिळाल्यानंतर भारताने सैन्य पाठवले. भारतीय लष्कराने बाल्तोरो आणि साल्टोरो पर्वतरांगांच्या प्रदेशात आपले नियंत्रण प्रस्थापित केले. त्या रेषेला ‘अ‍ॅक्चुअल ग्राऊंड पोझिशन लाइन’ (एजीपीएल) म्हणतात. ती ‘एनजे-९८४२’ पासून साधारण वायव्येला जाते.

चीनव्याप्त काश्मीरची जी सीमा आहे तिला प्रत्यक्ष नियंत्रण (लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल – एलएसी) म्हणतात. याशिवाय जम्मू-काश्मीरची चीनबरोबर ४६५ किमी. लांब आंतराष्ट्रीय सीमा आहे.