मुस्लिम स्त्रियांच्या समस्यांबाबत बोलणारी भाजप हिंदू स्त्रियांच्या प्रश्नांबाबत कधी बोलणार असा खरमरीत सवाल उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने केला आहे. या प्रश्नावरून पुन्हा चर्चांचा फड रंगण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

सपचे सरचिटणीस रामशंकर विद्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला उद्देशून हा सवाल केला आहे. ते म्हणाले, मुस्लिम महिलांच्या प्रश्नांबाबत भाजप विशेषत्वाने बोलते. मात्र, हिंदू विधवा महिलांची अवस्था देशात खूपच बिकट असून त्यांना जाणीवपूर्वक अनेक सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते. हिंदू महिलांच्या या प्रश्नाकडे आपलं कधी लक्ष जाणार त्यांच्या समान अधिकारांसाठी आपण कधी पावले उचलणार आहात. असा सवाल विद्यार्थी यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला विद्यार्थी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि कपिल सिब्बल यांना जबाबदार धरले आहे. या दोघांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपला मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळाले. त्यामुळेच भाजपला येथे विजय नोंदवता आला.

भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर विद्यार्थी यांनी समाजवादी पक्षालाही घरचा आहेर दिला असून गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील सपच्या कामगिरीचा आढावा पक्षाने घ्यायला हवा असे त्यांनी म्हटले आहे.