करोनाच्या मुद्दय़ावरून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चीनची बाजू घेत असल्याचे   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर ज्या पद्धतीने स्थिती हाताळण्यात आली त्याची डब्ल्यूएचओने स्तुती केली ते अयोग्य असल्याने अनेक देश नाराज असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ज्या चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला त्या देशाबद्दल डब्ल्यूएचओ अनुकूलता दर्शवित असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मार्को रुबिओ यांनी केला होता त्याबद्दल ट्रम्प यांना विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

डबल्यूएचओचे महासंचालक ट्रेडोस अधानोम घेब्रियेसस यांच्या चीनशी असलेल्या संबंधांबाबत यापूर्वी अनेकदा शंका उपस्थित करण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल काँग्रेसचे लोकप्रतिनिधी मायकेल मॅककॉल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

टीका.. : जागतिक आरोग्य संघटना चीनची बाजू घेत असून त्याबद्दल अनेक जण नाराज आहेत, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे बुधवारी पत्रकारांना सांगितले. तर करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ हे चीनचे मुखपत्र बनले असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकप्रतिनिधी ग्रेग स्टेयूब यांनी ट्विटद्वारे केला आहे.