नोवल करोना विषाणूमुळे अवघं जग सध्या संकटात सापडलं आहे. जगातील प्रत्येक देश या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी युद्धपातळीवर वेगाने संशोधनात गुंतला आहे. मात्र, या विषाणूला नष्ट करण्यासाठी अद्याप कोणत्याही स्वरुपाचं यश मिळू शकलेलं नाही. सध्या करोनावरील महत्वाच्या ८ लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. तर इतर ११० लस संपूर्ण जगभरात विकसीत होण्याच्या विविध टप्प्यातून जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्लूएचओ) ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, जगातील सर्व देश एकजूट होऊन या आजाराचा फैलाव संपवण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी या घातक विषाणूला मूळापासून संपवण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीनसहित इतर अनेक देशांनी लस तयार करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. शनिवारी चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहोंग यांनी म्हटले की, “२०२१ च्या मार्चमध्ये करोना विषाणू संपवण्यासाठी लस तयार झालेली असेल. लस तयार करण्यात सध्या मोठी अनिश्चितता आहे. करोना विषाणूला संपवण्यासाठी आजवर कोणतीही चांगली लस निर्माण होऊ शकलेली नाही. उलट एखादी लस यासाठी प्रभावी ठरु शकली तरी ती तयार होण्याची शक्यता पुढील वर्षी मार्च ते जून दरम्यानच असेल,”

तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला लस मिळेल.” याचबरोबर जगातील इतरही अनेक देशांच्यावतीनं देखील हाच दावा केला जात आहे की लवकरच लस शोधली जाईल.

करोना महामारीचा उद्रेक जगात अद्याप सुरुच आहे. करोनामुळं जगभरात एकूण ४४,३४,६५३ लोक संक्रमित झाले आहेत. यांपैकी ३,०२,१६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेने १६ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसिद्ध केलेला आहे.