खाद्यपदार्थांची पॅकेट्स किंवा खाद्यपदार्थ यावरू करोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली. खाद्यपदार्थांपासून संक्रमण होत असल्याच्या कोणत्याही माहितीवरून कोणीही भयभीत होऊ नये, असंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालिन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रायन यांनी खाद्यपदार्थ्यांची डिलिव्हरी किंवा प्रोसेस फूडच्या पॅकेटचा वापर करण्यास घाबरू नये असा सल्ला दिला आहे. “चीननं लाखो पॅकेट्सची चाचणी केली आणि त्यापैकी फारच कमी प्रकरणं समोर आली आणि ती १० पेक्षाही कमी आहेत,” अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या महामाही विषयाच्या तज्ज्ञ मारिया वॅन केरखोवे यांनी दिली.

चीनमध्ये ब्राझीलवरून आयात करण्यात आलेल्या फ्रोजन चिकनची तपासणी केली गेली तेव्हा त्यात करोना विषाणू आढळल्याचा दावा चीननं केला होता. याव्यतिरिक्त इक्वाडोरवरून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवरही करोना विषाणू सापडल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता. दरम्यान, चीनच्या दाव्यानंतर इक्वाडोरचे उत्पादन मंत्री इवान ओंटानाडा यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. तर दुसरीकडे ब्राझीलनंही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ब्राझीलमध्ये यासंदर्भात प्रोटोकॉल्सचं कठोरपणे पालन केलं जातं. तसंच खाद्यपदार्थ देशाबाहेर गेल्यानंतर त्या मालासह काय घडतं हा आमचा दोष नाही, असं स्पष्टीकरण ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.

सध्या जगभरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ कोटी १३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर आतापर्यंत यामुळे ७ लाख ६३ हजारांपेक्षा अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.