परवा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात पुन्हा एकदा बांगलादेश संघ त्याच्या वर्तन वैशिट्यामुळे चर्चेचा विषय झाला. सामन्या दरम्यान बांगलादेशी खेळाडूंनकडून दिल्या गेलेल्या प्रतिक्रियांमुळे मैदानावर बाका प्रसंग उभाराहिला. बांगलादेशी खेळाडूंनी पंचाचे काही निर्णय विरुद्ध गेल्याने निषेध म्हणून सामना सोडून द्यायचा निर्णय घेतला. विरुद्ध खेळाडूंच्या अंगावर ते धावून गेले. सामना जिंकल्यावर मैदानात धुडगूस घातला.( ड्रेसिंग रूम चा काचेचा दरवाजा बांगलादेशी खेळाडूंनीच फोडल्याची बातमी आली आहे ). या वर्तनाने क्रिकेट विश्व ढवळून निघाले. प्रश्न असा पडतो की अशा बेचव प्रसंगांमध्ये बांगलादेश संघ वारंवार कसा सापडतो? अशा प्रसंगांच्या मूळाशी नेमकी कोणती मानसिक आंदोलने असतात? थोडक्यात बांगलादेश संघाचे वर्तन हे मानसशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्या करता एक चपखल केस स्टडी म्हणून समोर येते.

बांगलादेशचा क्रिकेट संघ अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याकरता झगडतोय. गेल्या 25 वर्षात बांगलादेश मध्ये क्रिकेटने फुटबॉलला लोकप्रियतेत कधीच मागे टाकले आहे. (खरं म्हणजे भारतीय उपखंडाचा भाग असलेल्या देशात क्रिकेट सोडून दुसऱ्या खेळात लक्ष घालणे हे धर्मगुरूने केलेल्या पातकासमान मानले जात असल्याने फुटबॉल कडून क्रिकेट कडे झालेल्या संक्रमणाचे आश्चर्य वाटायला नको). या पंचवीस वर्षात बांगलादेश संघाचा स्वतःला सिद्ध करण्याचा शर्थीचा प्रयत्न चालूआहे. आपल्या कामगिरीतून त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे इतर संघाप्रमाणे महत्वाचे घटक आहोत हे दाखवून द्यायचे आहे.( Belonging need). उत्तम कामगिरी झाली की क्रिकेट विश्व आपल्याला सन्मानाने वागवेल ही त्यांची स्व-आदराची गरज आहे.(Esteem need).

पंचवीस वर्षात प्रयत्न करूनही दैदिप्यमान यशाने आत्तापर्यंत त्यांना हुलकावणीच दिली आहे. (106 कसोटीत अवघे दहा विजय आणि एकदिवसीय सामन्यात 30 टक्के विजय त्यातही कोणते प्रमुख विजेतेपद न मिळवता). या रेकॉर्ड मुळे त्यांना अजूनही इतर प्रमुख संघ गांभिर्याने घेत नाही. त्यांच्याशी कसोटी मालिका खेळण्याकरता प्रमुख संघ नाखूष असतात. प्रमुख संघाशी मिळालीच तर दोन कसोटीची अधून मधून छोटी मालिका मिळते.या मुळे बांगलादेश संघात rejection(नकार)ची भावना मूळ धरून आहे. जेव्हा नकार भावनेचा अंमल असतो तेव्हा कोणत्याही विरुद्ध गेलेल्या निर्णयाकडे विश्वासघात म्हणून पाहिले जाते. (उदा.पंचानी नो बॉल दिला नाही हा विश्वासघात) त्यातून revenge(सूड) भावनेचा उगम होतो. त्यामुळे सामना जिंकल्यावर केलेला धुडगूस हे सूड भावनेचे समर्थनहोते.सूडाच्या भावनेमुळे प्रतिस्पर्ध्याचे येणकेण प्रकारेण मर्दन करणे ही भावना वाढीस लागते. पण या लढाईत अपयश आले की त्याचे फलित विफलता असते. विफलतेतून निराशा आणि त्यातून कामगिरीवर होणारा परिणाम. मग पुन्हा नकार-सूड ह्याचे नवीन चक्र.

यातून बाहेर येण्याकरता बांगलादेश क्रिकेट मंडळाने विवेकवादी दृष्टिकोन स्विकारला तर मार्ग निघणे अवघड नाही. समस्येचं मूळ परिस्थिती नसून आपण आपली कार्यपद्धत बदलली पाहिजे हे मानस शास्त्रीय सूत्र लक्षात यायला हवं. या करता फक्तं गुणवत्तेवर आधारित खेळाडूंची निवड,संघात आपली जागा गृहित धरणाऱ्याना अर्धचंद्र,राजकारण विरहित कारभार,नवीन कष्टाळू आणि गुणवान खेळाडूंना संधी आणि इतर अनेक महत्वाची पावले उचलावी लागतील.

– रवि पत्की
sachoten@hotmail.com