भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण व्हावी असं मत व्यक्त केल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेल्या शहीद सीआरपीएफ जवानाच्या पत्नीने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित निर्माण व्हावी यासाठी चर्चेला एक संधी दिली गेली पाहिजे असं त्यांनी म्हटल होतं. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुरक्षित सुटका व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असं मत व्यक्त केलं होतं.

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले. यामध्ये मिता संतरा यांचे पती बबलू संतरा हेदेखील होते. आपण युद्धाविरोधात भूमिका घेतल्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहोत याची चिंता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘आपण युद्धाऐवजी चर्चेला एक संधी दिली पाहिजे. युद्धामुळे जीवीतहानी होऊन अनेक कुटंबांचं नुकसान होईल’, असं त्यांनी सांगितलं. भारतीय वैमानिक अभिनंदन यांचा पुन्हा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत असं आवाहन त्यावेळी मिता यांनी केलं होतं.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जावं अशी मागणी होत असताना मिता यांनी मात्र चर्चेतून मार्ग काढला जावा असं सांगितलं होतं. ‘युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. युद्धामुळे दोन्ही देशातील अनेक जवानांना मृत्यूला सामोरं जावं लागेल. अनेक महिला विधवा होतील, मुलं आपले वडील, आई आपली मुलं गमावतील’, असं मिता यांनी सांगितलं होतं.

चर्चेची भूमिका घेतल्याने मिता यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आपल्याला त्याची फिकीर नसल्याचं मिता यांनी सांगितलं आहे. जर एक व्यक्ती टीका करत असेल तर १० जण कौतुक करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ‘खरं सांगायचं तर १४ फेब्रुवारीनंतर मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही आहे. कोणीही काहीही बोलू शकतं, मला चिंता नाही’, असं रोखठोक उत्तर त्यांनी दिलं आहे. ट्रोल करणाऱ्यांपैकी किती जणांचं कुटुंब सैन्यात आहे असा प्रश्नही यावेळी त्यांनी विचारला. ‘घरात बसून अनेकजण अनेक गोष्टी बोलत आहेत. पण त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य लष्कर, हवाई दल, नौदलात किंवा निमलष्करी दलात आहे का’, असा प्रश्न त्यांनी विचारला.

जवानांनी युद्धासाठी जाणं आणि देशासाठी बलिदान देणं साहजिक आहे, पण सरकारने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.