चीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या साडेचार हजारहून अधिक झाली आहे. अशाच आता जगभरामध्ये फैलाव झालेल्या करोनामुळे काही देशांमधील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. इराणमधील तीन खासदारांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाही करोना झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपासून सोफी यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. याच पार्श्वभूमीवर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल नुकतेच हाती आले असून सोफी यांना करोना झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानेच दिली आहे.

सोफी यांना करोना झाला असला तरी जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये करोनाची कोणतीच लक्षणे दिसून येत नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. सोफी यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रुडो कुंटुंबाला इतरांपासून वेगळं ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची नजर असणार असून ट्रुडो पुढील १४ दिवस घरूनच काम करणार आहेत. ट्रुडो शुक्रवारी आणि शनिवारी काही अधिकाऱ्यांना भेटणार होते. मात्र पत्नीची करोना चाचणी घेण्यात आल्यानंतर या चाचणीचा निकाल येण्याआधीच ट्रुडो यांनी आपल्या सर्व बैठक रद्द केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी ते फोनवरुनच चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.