12 July 2020

News Flash

फाशी सुनावलेल्या पाकिस्तानातील ८००० कैद्यांचे भवितव्य टांगणीला

पेशावर येथील लष्करी शाळेतील नृशंस हत्याकांडानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी फाशीवरील स्वयंघोषित बंदी उठवल्याने देशात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या सुमारे ८ हजार २६१ कैद्यांचे भवितव्य

| December 19, 2014 07:19 am

पेशावर येथील लष्करी शाळेतील नृशंस हत्याकांडानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी फाशीवरील स्वयंघोषित बंदी उठवल्याने देशात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या सुमारे ८ हजार २६१ कैद्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
देशातील सुमारे ६० कारागृहांतील ८ हजार २६१ कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील ३० टक्क्यांहून अधिक जणांना २००३-०४ नंतर विशेष न्यायालयाने दहशतवादविरोधी कायद्याखाली दोषी जाहीर केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यातील बहुतांश कैद्यांनी सुटकेसाठीचे सर्व मार्ग अवलंबले आहेत आणि सरकारने परवानगी दिली, तर येत्या आठवडय़ाच्या आत ते फासावरही चढतील अशी शक्यता आहे, असेही या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. २००४ पासून पाकिस्तान सरकारने २३५ कैद्यांना फासावर चढवले आहे आणि विशेष म्हणजे २००८ मध्ये सरकारने फाशीच्या शिक्षेवर स्वयंघोषित स्थगिती आणल्यानंतर केवळ दोनच कैद्यांना फाशी झाल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे.
पेशावर येथील लष्करी शाळेतील दहशतवादी हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४८ जणांना ठार करण्यात आले. या घटनेनंतर लगेचच पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानातील फाशीवरील स्वयंघोषित स्थगिती उठवण्याचे जाहीर केले. मृत्युदंडासारख्या गंभीर शिक्षेतून सुटका करून घेणाऱ्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यासाठी देशातील न्यायव्यवस्थेतील दोष दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले सरकार महत्त्वाची कायदेशीर पावले उचलेल, असे शरीफ यांनी बुधवारीच स्पष्ट केले होते. २००८ साली जाहीर फाशीवर बंदी घालण्यात आली होती. याआधीही शरीफ यांनी फाशीवरील बंदी उठवण्याचे प्रयत्न केले होते; परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते.

तुरुंगातून पुन्हा दहशतवादाकडे?
जवळपास ९९१ दोषींना पोलिसांनी किंवा दहशतवादविरोधी न्यायालयाने गुन्हेगार म्हणून जाहीर केले आहे. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे; परंतु त्यांची सुटका करण्यात आली आहे आणि ते लवकरच दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतील, अशी दाट शक्यता राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादी ठार
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा शहरातील सियालकोट भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्याने गुरुवारी सकाळी या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. या वेळी दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून या ओळख न पटलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह काही शस्त्रे आणि दारूगोळा यासह आढळून आला.

जयललितांना दिलासा
नवी दिल्ली: बेहिशेबी मालमत्ता खटल्यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चार महिन्यांनी वाढवला. याच वेळी जयललिता यांच्या याचिकेवर तीन महिन्यांच्या आत तातडीने निर्णय घेण्यासाठी विशेष पीठ स्थापण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाला दिले. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या पीठाने हा आदेश दिला. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला जयललिता यांनी एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. यावर नियमित तत्त्वावर सुनावणी व्हावी, असे पीठाने उच्च न्यायालयाला दिलेल्या निर्देशात स्पष्ट केले.

नायजेरियात अपहरण
मैदुगुरी : बोको हराम संघटनेने नायजेरियाच्या ईशान्य भागातील गुमसुरी गावातून किमान १८५ लोकांचे अपहरण केले असून, संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या सांबिसा जंगलात ओलीस म्हणून ठेवले आहे, असे दोन स्थानिक अधिकारी आणि या गावातील एका नेत्याने सांगितले.

चौघांना जन्मठेप
नवी दिल्ली : चाळीस वर्षांपूर्वी समस्तीपूर रेल्वे स्थानकावर बाँबस्फोट घडवून तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्र यांची हत्या केल्याच्या प्रकरणात येथील न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मिश्र यांच्यासह आणखी दोघांची हत्या केल्याच्या गुन्ह्य़ासाठी रंजन द्विवेदी (६६), संतोषानंद (७५), सुदेवानंद (७९) आणि गोपालजी (७३) या चौघांना जन्मठेप सुनावण्यात आल्याचा निकाल जिल्हा न्यायाधीश विनोद गोयल यांनी भरगच्च न्यायालयात आज जाहीर केला.

उत्तर भारताला हुडहुडी
नवी दिल्ली: उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढला असून काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागात गोठवणारी थंडी व दाट धुक्यामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. राजधानी दिल्लीत सकाळी धुके पसरले होते आणि किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअस इतके होते. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी, म्हणजे १९.६ अंश सेल्सिअस होते. त्याचा परिणाम येथील जनजीवनावर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 7:19 am

Web Title: with 8000 prisoners on death row pakistan backs down death penalty
टॅग Pakistan
Next Stories
1 मराठा आरक्षणाची स्थगिती कायम
2 धर्मातरावरून राज्यसभेत कोंडी कायम
3 ओबीसींना स्वतंत्र मंत्रालयाची मागणी
Just Now!
X