केरळमधील प्रोफेसर रणजीत कुमार यांनी तृतीयपंथीयासंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘ज्या महिला पुरुषांप्रमाणे कपडे परिधान करतात, त्या तृतीयपंथी मुलांना जन्म देतात’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मायक्रोबायोलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेल्या रणजीत कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने त्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे. कासरगोडे येथे एका जागरुकता शिबिरात त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘ज्या महिला पुरुषांप्रमाणे कपडे परिधान करतात, त्या ज्या मुलांना जन्म देतात ती तृतीयपंथी असतात. केरळमध्ये अशा सहा लाख बाळांचा जन्म झाला आहे. जर महिलांनी त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान केला तर त्याना होणारं बाळ मुलगी असली तरी त्याच्यात मुलाचे गुण असतात. हेच मुल पुढे जाऊन तृतीयपंथी होतं’, असं वक्तव्य केलेली रणजीत कुमार यांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. समुदेशनादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.

आतापर्यंत रणजीत कुमार केरळमधील जवळपास १७०० जागरुकता कार्यक्रमात सहभागी झालेत. राज्याचे आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी रणजीत कुमार यांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत त्यांना यापुढे कोणत्याही जागरुकता कार्यक्रमात सहभागी न करुन घेण्याचा आदेश दिला आहे. सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या विचारात आहे असं त्यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितलं आहे.

रणजीत कुमार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टला उत्तर देताना माझ्या जागरुकता शिबीरातून खूप चांगले निकाल समोर आले असून त्यामुळेच मला पालक आणि त्यांच्या मुलांकडून निमंत्रण दिलं जातं. माझे क्लासेस गरिबांसाठी असून श्रीमंतांसाठी नहाीत. जर सरकारने माझ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर हा त्या गरिब मुलांचा तोटा आहे असं म्हटलं आहे. त्यांनी आपल्यावरली सर्व आरोप फेटाळून लावत आपण जे दावे केलेत त्यामागे शास्त्र आहे असं म्हटलं आहे.