इंग्लंडमध्ये एका महिलेने बेड तयार करणाऱ्या कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. प्रणयक्रिडेदरम्यान बेड तुटल्याने महिलेला गंभीर दुखापत झाल्याने या महिलेने बेड तयार करणाऱ्या कंपनीला न्यायालयात खेचले आहे.

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या क्लेयर बस्बे या ४६ वर्षांच्या आहेत. त्यांना चार मुलंदेखील आहेत. पाच वर्षांपूर्वी क्लेयर आणि त्यांचा प्रियकर रात्री घरी पोहोचले. बेडवर प्रणयक्रिडेत मग्न असताना बेड तुटला आणि यामुळे क्लेयर यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्या व्हिलचेअरवर आहेत.या प्रकारानंतर क्लेयर यांनी बेड तयार करणाऱ्या कंपनीला थेट न्यायालयात खेचले आहे.

क्लेयर यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या घरातील बेड हा नवीन होता. कंपनीनेच सदोष बेड विकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर क्लेयर यांच्या बहिणीनेही कंपनीलाच जबाबदार ठरवले. २०१३ मध्ये मी हा नवीन बेड खरेदी केला होता.मात्र, काही आठवड्यांमध्येच हा बेड तुटला. यासाठी कंपनीच जबाबदार आहे, असे क्लेयर यांनी सांगितले. तर कंपनीने मात्र क्लेयर यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगितले. आम्ही सुस्थितीत असलेला बेडच क्लेयर यांना विकला होता, असे कंपनीने म्हटले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.