आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी, २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तेलगू देसम एनडीएसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी तेलगू देसमच्या खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र प्रचंड बहुमताच्या आधारावर हा प्रस्ताव लोकसभेत पडला. २०१४ साली आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल याच एका अटीवर आम्ही भाजपसोबत गेलो होतो, मात्र आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत, मंत्रीपदाची आम्हाला लालसा नाही असं म्हणत चंद्राबाबूंनी मोदींना अप्रत्यक्ष टोला हाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल, आमच्या रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता मिळेल यासाठी आम्ही ४ वर्ष वाट पाहिली. मात्र भाजपने आम्हाला दगा दिला, यापुढेही ते असेल वागणार नाहीत याची खात्री देता येत नाही. लोकसभेत आम्ही दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव हा, तत्व विरुद्ध पाशवी बहुमत असा सामना होता.” नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान नायडू पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आपल्या अविश्वास प्रस्तावाला पाठींबा देणाऱ्या विरोधी पक्षांचेही चंद्राबाबूंनी आभार मानले.

शुक्रवारी तब्बल १२ तास चाललेल्या चर्चेनंतर, तेलगू देसम पक्षाने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव ३२५ विरुद्ध १२६ मतांनी पडला. चर्चेदरम्यान शिवसेना आणि बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग केल्यामुळे विरोधकांना असलेल्या आशांना सुरुंग लागला. विश्वासदर्शक ठराव लोकसभेच चर्चेसाठी येण्याआधी तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. ४ वर्षांमध्ये मोदी किंवा राजनाथ सिंह यांच्यापैकी कोणत्याही नेत्याने आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची तसदी घेतली नाही, त्यामुळे २०१९ साली एनडीमध्ये परत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont join nda for 2019 elections says andhra cm chandrababu naidu
First published on: 21-07-2018 at 21:19 IST