हरलेल्या उमेदवाराला विजेत्याचं प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी एका निवडणूक अधिकाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या पंचायत निवडणुकांदरम्यान हा प्रकार घडला आहे.

या प्रकारामुळे अतिरिक्त निवडणूक अधिकारी वीरेंद्र कुमार याच्याविरोधात निवडणूक अधिकारी सुनील कुमार यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्याच्या फसवणुकीमुळे आम्हाला विजयी घोषित कऱण्यात आलं नाही असा आरोप करत उमेदवाराच्या समर्थकांनी नई बाजार पोलीस चौकीत जाळपोळ केली. पोलिसांनी १८ जणांना अटक करत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्या आहेत.

गुरुवारी मतमोजणीनंतर रवी निशाद आणि कोडाई निशाद या उमेदवारांनी असा दावा केला की ते २००० मतांनी निवडून आले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही. मात्र, बुधवारी सकाळी हे विजयाचं प्रमाणपत्र त्यांच्याच मतदारसंघातले गोपाल यादव आणि रमेश यांना देण्यात आलं होतं.

हे लक्षात येताच रवी आणि कोडाई यांच्या समर्थकांनी गोंधळ केला आणि दगडफेक तसंच जाळपोळही केली. ही घटना लक्षात येताच जिल्हाधिकारी विजयेंद्र पांडियन यांनी निवडणूक केंद्रानुसार मतांची पडताळणी केली आणि गुरुवारी रवी आणि कोडाई या दोघांनाही विजेते घोषित केलं.