News Flash

यशवंत सिन्हा ‘तृणमूल’मध्ये

मोदी-शहांमुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका

(संग्रहित छायाचित्र)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर पकडत असताना शनिवारी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. म्हणून मोदी सरकार २०२४ मध्ये पराभूत झाले तरच देश वाचेल, अशी टीका सिन्हा यांनी केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने २०१८ मध्ये भाजपला राम राम ठोकला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सिन्हा एक वजनदार नेते होते. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे भाजपचे झारखंडमधील हजारीबाग येथील खासदार आहेत.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिन्हा यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘‘मोदी सरकारला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे असेल तर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळणे आवश्यक आहे.’’ २०२४ मध्ये मोदी सरकार पराभूत झाले तरच देश वाचेल, अशी टीकाही त्यांनी केली.

सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपविरोधी लढाईत पाठिंबा दिला. तृणमूल काँग्रेस पक्ष बहुमताने जिंकला तर तो विजय आपल्याला इतर पातळ्यांवर नेता येईल, असे नमूद करून ते म्हणाले की, गोपाळ कृष्ण गोखले नेहमी म्हणत असत की, जो विचार बंगाल राज्य आज करते, तो विचार उद्या देश करीत असतो. बंगालमधूनच आतापर्यंत सर्व बदल घडत आले आहेत. ‘‘विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला, तरच आपण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांच्या भाजपला टक्क र देऊ शकू’’, असेही सिन्हा म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप वेगळा होता. त्यांचा मतैक्यावर विश्वास होता. मोदी आणि शहा विरोधी मते दडपून टाकत आहेत. अटलजी लोकांना बरोबर घेऊन जात होते. सध्याचे सरकार लोकांवर कुरघोडी करू पाहत आहे. अटलजींचा आघाडीवर विश्वास होता, आता आघाडीचे घटक पक्ष भाजपला सोडून चालले आहेत, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सिन्हा म्हणाले, ‘‘करोनामुळे अचानक टाळेबंदी लागू करून मजूर-कामगारांना घरी जाण्यास भाग पाडले गेले. शिक्षण, आरोग्य यांची वाईट अवस्था आहे. सरकारला कशाचीही तमा नाही. म्हणून आजची लढाई महत्त्वाची आहे, ती निवडणूर्क जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर प्रजासत्ताक वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे.’’

कंदहार विमान अपहरण प्रकरणावेळी तृणमूल काँग्रेस हा सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष होता. त्या वेळी बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपहरणकत्र्यांना भेटून ओलिसांची सुटका करण्याची तयारी दर्शवली होती. त्या जिवाला घाबरत नाहीत, अशा शब्दांत सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने तृणमूलची मते फार वाढण्याची शक्यता नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु सिन्हा यांच्यामुळे तृणमूलच्या भाजपवरील टीकेला धार चढेल, यात शंका नाही. तृणमूलचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी सिन्हा यांचे पक्षात स्वागत केले.

…तर ममता दहशतवाद्यांकडे ओलीस जाणार होत्या!

कोलकाता : तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. त्या लढवय्या आहेत, जिवाची पर्वा करत नाहीत, असे ते म्हणाले. १९९९ मधील कंदहार विमान अपहरणावेळचा ममता यांच्या धाडसाचा एक दाखलाही सिन्हा यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेले होते. त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता यांनी, ‘‘अपहृत प्रवाशांची मुक्तता करण्याच्या अटीवर स्वत: दहशतवाद्यांकडे ओलीस जाण्याची तयारी दर्शवली होती.’’ त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सिन्हा अर्थमंत्री तर ममता रेल्वेमंत्री होत्या.

देशात विचित्र परिस्थिती!

‘तृणमूल’ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिन्हा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केले. मोदी आणि शहा यांच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीची शक्ती ही तिच्या सहयोगी संस्था मजबूत असण्यात असते. आता सर्वच संस्था व्यवस्थात्मक पातळीवर डळमळीत झाल्या आहेत. देशात विचित्र परिस्थिती असून आपल्या प्रजासत्ताकाची मूल्ये आणि उद्दिष्टे जोपासली जाताना दिसत नाहीत, अशी खंत सिन्हा यांनी व्यक्त केली.

नंदीग्राममध्ये ममता यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर त्यांनी हल्ल्याची घटना आपल्याला कथन केली. ममता यांच्यावर हल्ला झाल्यानेच त्यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार केला. सध्याचे भाजप सरकार निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकते.

– यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:31 am

Web Title: yashwant sinha in trinamool abn 97
Next Stories
1 ‘लस, नियमांचे पालन हाच उपाय’
2 चीनच्या आव्हानाबाबत ‘क्वाड’ नेत्यांमध्ये चर्चा
3 म्यानमार : गोळीबारात ४ ठार
Just Now!
X