योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद डेअरी विभागाने गुरूवारी आणखी एका क्षेत्रात पर्दापण केले आहे. रामदेव बाबांच्या उपस्थितीत आज गाईचे दूध आणि त्यापासून बनवण्यात आलेली उत्पादने लाँच करण्यात आली. गायीच्या दुधाचे दर हे ४० रूपये प्रति लिटर असे असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या गायीच्या दुधापेक्षा पतंजलीचे दूध हे २ रूपयांनी स्वस्त असेल. दिल्लीतील तालकटोरा स्टेडिममध्ये डेअरी उत्पादने लाँच करण्यापूर्वी रामदेव बाबांनी स्वत: गायीचे दूध काढले. पतंजलीने गायीच्या दुधाबरोबर दही, ताक आणि पनीरची उत्पादने सादर केली. पतंजली आधीपासूनच गायीचे तूप विकत आहे.

पतंजलीला २०२० पर्यंत या विभागातून सुमारे १००० हजार कोटी रूपयांच्या महसुलाची अपेक्षा आहे. या आर्थिक वर्षात डेअरी उत्पादनांच्या माध्यमातून ५०० कोटींच्या महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाचा पुरवठा करण्यासाठी ५६ हजार किरकोळ विक्रेते आणि वितरक नेमेले आहेत. त्यांच्या माध्यमातून २०१९-२० मध्ये प्रति दिन १० लाख लिटर गायीचे दूध पुरवठा करण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी प्रति दिन ४ लाख लिटर दूध उत्पादन केल्याचे पतंजलीने सांगितले. कंपनी लवकरच सुगंधी दूधही लाँच करणार आहे.

गायीच्या दूध प्रकल्पामुळे सुमारे १ लाख शेतकरी/पशुपालक पतंजलीबरोबर जोडले जाणार आहेत. पुढील वर्षी नवीन उत्पादनाच्या लाँचिंगमुळे ५ लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

आज लाँच करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये दुग्ध अमृत पशु आहार आणि बॉटलबंद पाणी दिव्य जलचाही समावेश आहे. पतंजलीने गायीचे दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेले उत्पादने टप्प्याटप्प्याने बाजारात सादर करण्याची योजना केली आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. इतर राज्यात हळूहळू विक्री सुरू केली जाईल. आइस्क्रीम आणि इतर डेअरी उत्पादनातही उतरण्यासाठी पतंजलीची तयारी सुरू आहे.