आधुनिक जीवनशैलीमुळे आलेले शारीरिक आजार बरे करण्याची क्षमता योगामध्ये असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये केले. पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्त राष्ट्रपती भवनामध्येही योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
ते म्हणाले, योगा हे एक शास्त्र असून ती कलाही आहे. अनेक वर्षांपासून अनेक जण योगसाधना करताहेत. योगा हे मानवी कल्याणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे शारीरिक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. राष्ट्रपती भवनातील निवासी लोक योगा करीत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. त्यामुळेच पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसांचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय मी घेतला, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त देशात विविध ठिकाणी योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
(सोबतचे छायाचित्र राष्ट्रपती कार्यालयाच्या फेसबुक वॉलवरून साभार)