उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारताच भावुक झाले. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. लखनऊ येथे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी सरकारने दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी काय पावले उचलली आहेत असा प्रश्न त्यांना विचारला.

हल्ला झाला आपण तपास करणार त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येणार. हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे सरकार काय करत आहे ? असे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करु. काश्मीरमध्ये सध्या जे घडत आहे ते म्हणजे दिवा जेव्हा विझायला येतो तेव्हा तो अधिक प्रखर होतो तसे आहे.

दहशतवाद शेवटाला पोहोचला आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे असे योगींनी त्या विद्यार्थ्याला उत्तर दिले. ‘युवा के मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. योगींच्या या उत्तरावर सभागृहात टाळयांचा एकच कडकडाट झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी योगी आदित्यनाथ भावुक झाले होते. त्यांनी आपल्या भगव्या वस्त्रातून रुमाल काढला व डोळे पुसले.