तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाही आहात,” ह्रदयाचं पाणी पाणी करणारे हे शब्द आहेत एका मुलाचे. ज्यांच्या आईवडिलांचा पेटवून घेतल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस घराबाहेर काढत असल्याचं बघून घाबलेल्या एका दाम्पत्यानं स्वतःला पेटवून घेतलं. यात दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. दुःखाचं आभाळ कोसळलेल्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही घटना केरळमध्ये घडली आहे.

“तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांना ठार मारले आहे… तुम्ही सर्वांनी माझ्या आई-वडिलांना मारले. आता मी त्यांचे अत्यंसंस्कारही करू शकत नाही का? ” असं आर्जव करणाऱ्या केरळच्या २३ वर्षीय राहुल राजचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल वडिलांना दफन करण्यासाठी जमीन खोदताना दिसत आहे. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आजूबाजूला असलेले लोकंही शांतपणे हे दृश्य पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत.


तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अथियानोर पंचायत येथील राहुलचे वडील पोंगील राजन आणि त्यांची मानसिकदृष्ट्या अपंग असलेली पत्नी अंबिली यांनी २२ डिसेंबर रोजी स्वत:ला पेटवून घेतले. राजन यांनी गावात १३०० स्क्वेअर फूट जागेवर घर बांधले होते. न्यायालयाने ही जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी राजन आणि त्याच्या पत्नीला घराबाहेर काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी स्वत:ला चुकून पेटवून घेतले. यात गंभीर जखमी झालेल्या राजन आणि अंबिली दोघांचाही मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- झाडाची पानं तोडल्याने मारहाण झालेल्या दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात राजनने पोलिसांपासून वाचण्यासाठी स्वतःवर आणि पत्नीवर पेट्रोल टाकले, असे सांगितले आहे. “पोलिसांना दूर ठेवण्यासाठी मी लायटर पेटवला होता. माझी आत्महत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने लाईटर फटका मारल्याने ते आमच्यावर पडले. त्यामुळे आम्ही आगीच्या भक्षस्थानी पडलो” असे राजनने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. “पोलीस आल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या डोक्यावरील हक्काचं छत जाईल या भीतीने मी चक्रावून गेलो. पोलिसांपासून वाचण्यासाठी मी माझ्या पत्नीला घराबाहेर आणले आणि स्वतःच्या आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकले जेणे करून पोलीस निघून जातील”, असे राजनने आपल्या जवाबात म्हटलं आहे.

आणखी वाचा- नाताळाच्या पार्टीला गेल्याने कट्टरतावादी मुस्लीम युवकांनी मित्रालाच केली बेदम मारहाण

राजन हे त्यांची पत्नी आणि राहुल व रणजित या दोन मुलांसह एका मागास वस्तीत राहत होते. तेथे त्यांनी एक शेड तयार केले होतं. यावर वसंता नावाच्या महिलेने आक्षेप घेतला. १६ वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केल्याचे या महिलेने सांगितले. स्थानिक दिवाणी न्यायालयाने वसंता यांच्याबाजूने निकाल दिला. दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने राजन यांना जमीन रिकामी करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी वकिलांच्या आयोगाची नेमणूक केली. आयोगाच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने पुन्हा राजन कुटुंबाला तेथून हटवण्याचे आदेश दिले.

“२२ डिसेंबर रोजी पोलीस आमच्या घरी पोहचले. मात्र तोपर्यंत, वडिलांनी स्थानिक मुन्सिफ न्यायालयाकडून हद्दपार करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळविली होती. मात्र वडिलांना या आदेशाची प्रत मिळाली नव्हती. दुसरीकडे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार वडिलांना सर्व वस्तू घेऊन आमच्या घराबाहेर पडायला सांगितले. त्यानंतर वडिलांनी आईला बाहेर आणले,” असे राहुलने सांगितले. सोमवारी राजनचा मृत्यू झाल्यानंतर ज्या जागेसाठी वडिलांनी आपले प्राण गमावले, त्या जागेवर त्यांना दफन करावे, असा आग्रह त्यांच्या मुलांनी केला. त्यानंतर राहुलने स्वत: खड्डा खोदण्यास सुरुवात केली. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र नंतर राहुलने वडिलांवर त्याचं ठिकाणा अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी केरळच्या पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) या दाम्पत्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.