लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा ते निवडणूक आयोग असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांचा समावेश आहे. मत चोरीच्या आरोपांवर उत्तर द्या अशा मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अखिलेश यादव यांनी विचारलं आहे की आम्हाला पोलीस का रोखत आहेत आम्ही शांततेत मोर्चा काढला आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातले ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत.
अखिलेश यादव यांनी काय म्हटलं आहे?
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर आमच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निवारण निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. पण आम्हाला इथे अडवलं जातं आहे.उत्तर प्रदेशातही मतांची लूट केली जाते आहे. आम्हाला संसदेत आमचं म्हणणं मांडायचं आहे पण विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आहे.
राहुल गांधींचे नेमके आरोप काय होते?
राहुल गांधी यांनी मागच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतांची चोरी कशा मार्गाने केली गेली, त्याचा प्रयोग देशभरात कसा झाला? हे त्यांनी विविध याद्या दाखवत आणि त्यातले घोळ दाखवत सांगितलं. ज्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली. मात्र या सगळ्याचा विचार न करता राहुल गांधी यांनी आज त्यांच्या नेतृत्वात विरोधी खासदारांना बरोबर घेत व्होट चोरीच्या विरोधात मोर्चा काढला. या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात या खासदारांना नेण्यात आलं होतं. या मोर्चात शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, काँग्रेसमधले दिग्गज नेते, इंडिया आघाडीचे खासदार हे सगळे उपस्थित होते.