गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर शनिवारी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दिवाळीसाठी आपापल्या मूळ गावी जाणाऱ्या परराज्यातील लोकांची शनिवारी सुरत स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. यावेळी रेल्वेत चढत असताना चेंगराचेंगरी झाली असून यात एकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण बेशुद्ध झाले आणि काहीजण जखमी झाले आहेत.

चेंगराचेंगरीची घटना समोर येताच स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून काहींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सुरतचे खासदार आणि गुजरातचे रेल्वे मंत्री दर्शना जरदोश यांनी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सणासुदीच्या काळात विशेष गाड्या

रेल्वे खात्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकोर म्हणाले, “सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेने या वर्षी मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये सुमारे ४०० फेऱ्यांसह ४६ विशेष गाड्या सोडल्या आहेत. सात लाखांहून अधिक प्रवासी याचा लाभ घेत आहेत. तसेच रेल्वेस्थानकावरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सुरत रेल्वे स्थानकावर जवळपास १६५ आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त काउंटरही उघडण्यात आलं आहेत.”