मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली होती. ज्या मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत, त्या मशिदीसमोर भोंग्यावरून हनुमान चालीसा पठण करावी, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. भोंगे उतरवत असताना उत्तर प्रदेशात अद्याप कोणताही वाद झालेला नाही. मुस्लीम बांधवांनी सहकार्य करत भोंगे उतरवण्यात उत्तर प्रदेश प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य केलं आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितलं की, “आतापर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे १ लाख भोंगे उतरवण्यात आले आहेत.”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, “आमच्या सरकारनं भोंग्याचं प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळलं आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून आतापर्यंत सुमारे १ लाख भोंगे हटवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात भोंगे हटवल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात कर्कश कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भोंगे हटवताना कुठेही वाद झाला नाही. यूपी पोलीस सातत्यानं भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत.”

त्यांनी पुढे म्हटलं की, “आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाज पठण करण्याचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, असे सक्त आदेश आम्ही दिले होते. आता रस्त्यावर कुणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची संख्या २५ कोटींच्या आसपास आहे. असं असूनही ईदच्या दिवशी देखील कुठेही रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली नाही. रस्ते हे वाहतुकीसाठी असतात. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांत किंवा मशिदीत नमाज अदा करून नवीन आदेशाचं पालन करत आहेत.”