कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात झालेल्या चाकू हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कॅनडात खळबळ माजली असून, दोन संशयितांचा शोध घेतला जात आहेत. जवळपास १३ ठिकाणी चाकू हल्ला झाला असून कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, दोन संशयित हल्लेखोरांची ओळख पटली असून डेमियन सँडरसन (३१) आणि माइल्स सँडरसन (३०) अशी त्यांची नावं आहेत. दोघांचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. दोघे संशयित काळ्या रंगाच्या निसान गाडीतून आले होते अशी माहिती आहे. जेम्स स्मिथ क्री नेशन आणि वेल्डन गावापासून सुमारे ३२० किमी अंतरावर असणाऱ्या रेजिना शहरात ते दिसले अशी पोलिसांची माहिती आहे.

सस्केचेवान रॉयल कनाडियन माऊंटेड पोलीस विभागाचे कमांडिग अधिकारी रोंडा ब्लॅकमोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही जणांना टार्गेट करुन, तर काहींवर सहजपणे हल्ला करण्यात आल्याचं दिसत आहे. या हल्ल्यामागे नेमकं काय कारण होतं याबद्दल आता काही सांगणं कठीण आहे”. काही जखमी स्वत: रुग्णालयात दाखल झाल्याची शक्यता असल्याने, संख्या वाढू शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सर्वात प्रथम पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी चाकू हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली. यानंतर तीन तासांतच पोलिसांनी धोकायदाक व्यक्तीचा वावर असल्याचा अलर्ट जारी केला. संध्याकाळपर्यंत आणखी काही प्रातांमध्ये अशाच प्रकारे चाकू हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाण सोडू नये असं आवाहन केलं असून, संशयित व्यक्ती दिल्यास माहिती देण्यास सांगितलं आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक –

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला असून, हे फारच भयानक आणि मन हेलावून टाकणारं असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं तसंच जखमी झाले आहेत त्यांचा विचार मी करत आहे असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

रोंडा ब्लॅकमोर यांनी संशयित कोणत्या दिशेने गेले आहेत याचा अंदाज नसून, त्यांनी गाडी बदलली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. जे काही घडलं आहे ते भयानक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 dead in mass stabbing in canada police hunt for suspects sgy
First published on: 05-09-2022 at 07:42 IST