सियाचेन भागात अतिशय उंचावर असलेल्या लष्करी चौकीला हिमवादळाचा तडाखा बसल्याने बर्फाखाली गाडल्या गेलेल्या लष्कराच्या १० जवानांचा मृत्यू ओढवला आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांनी या जवानांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
लडाख क्षेत्रात पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेजवळ १९६०० फूट उंचीवर असलेल्या या चौकीला बुधवारी हिमवादळाने धडक दिल्यामुळे एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी आणि मद्रास रेजिमेंटचे ९ जवान बर्फाखाली गाडले गेले. त्यांचा शोध व बचावासाठी लष्कर आणि वायुदलाच्या विशेष प्रशिक्षित चमूंनी बुधवारपासून कसून प्रयत्न केले होते.
गुरुवारी सकाळी लेह येथून विमानाने पाठवण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे असलेली पथके आणि प्रशिक्षित कुत्रे यांनाही बचावकार्यात सहभागी करून घेण्यात आले. मात्र बेपत्ता सैनिकांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
‘सियाचेन येथे सैनिकांचा मृत्यू अतिशय दु:खद आहे. देशाकरिता स्वत:चे प्राण अर्पण करणाऱ्या या जवानांना मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबीयांबाबत माझ्या संवेदना मी व्यक्त करतो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर म्हणाले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. सियाचेनच्या सगळ्यात कठीण अशा प्रदेशात आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या आमच्या शूर सैनिकांच्या आप्तस्वकीयांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
ही अतिशय दु:खद घटना असून, आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सर्व आव्हानांना तोंड देऊन कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान केलेल्या आमच्या सैनिकांना आम्ही सलाम करतो, असे नॉर्दर्न कमांडचे लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा म्हणाले. मात्र जवानांपैकी कुणी जिवंत सापडण्याची शक्यता अतिशय अंधूक असल्याचे सांगताना आम्हाला खेद वाटतो, असे संरक्षण विभागाचे (उत्तर कमांड) प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते.