Pakistan Terror Attack : पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी एक मोठ दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी १० दहशतवाद्यांना अटक केली असून यामध्ये टीटीपीच्या दोन सर्वात धोकादायक दहशतवाद्यांचाही समावेश आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी विभागाने (सीडीटी) शनिवारी दिली. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांत प्रांताच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत बंदी घातलेल्या तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या १० दहशतवाद्यांना अटक करून पंजाबमधील एक मोठी दहशतवादी योजना उधळून लावण्यात आली, असं सीटीडीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. टीटीपीच्या दोन सर्वात धोकादायक दहशवाद्यांना खुशाब आणि रावळपिंडी येथून स्फोटकांसह अटक करण्यात आली आहे. त्यांची ओळख रियाज आणि रशीद अशी आहे, असं प्रवक्ते म्हणाले.

शस्त्रे आणि स्फोटकांसह दहशतवाद्यांना अटक

सीटीडी पंजाबने प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ७३ गुप्तचर यंत्रणांवर आधारित कारवाया केल्या. यामध्ये १० दहशतवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटकांसह अटक करण्यात आली. दहशतवाद्यांच्या ताब्यातून एकूण २.६९ किलोग्रॅम स्फोटके, १९ डेटोनेटर्स, ३५ फूट सेफ्टी फ्यूज वायर, एक आयडी बॉम्ब आणि बंदी घातलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी लाहोरमधील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्याची योजना आखली होती, असं प्रवक्त्याने सांगितलं. अटक केलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच, सीटीडीने १ मार्च रोजी सांगितलं होतं की पंजाब प्रांतात टीटीपीशी संबंधित असलेल्या एका शीखसह २० दहशवाद्यांना अटक करण्यात आली, कारण अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्याच्या एका आठवड्यात पंजाबच्या वेगवेगळ्या भागात १६२ गुप्तचर आधारित कारवायांमध्ये एक मोठा दहशतवादी धोका उधळून लावला होता.