पीटीआय, नवी दिल्ली

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) २०२३ सालामध्ये पंजाबमधील भारत- पाकिस्तान सीमेवर १०७ ड्रोन एकतर पाडले किंवा हस्तगत केले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली.भारताच्या पश्चिम दिशेला जम्मू, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्यांलगत असलेल्या २२८९ किलोमीटरहून अधिक लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे बीएसएफ संरक्षण करते. पंजाबची पाकिस्तानलगत ५५३ किलोमीटरची सीमा आहे.

 हस्तगत करण्यात आलेल्या ड्रोन्सपैकी बहुतांश सर्व चिनी बनावटीची होते आणि गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ती बव्हंशी सीमेलगतच्या शेतांतून जप्त करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने अधिकृत आकडेवारीच्या हवाल्याने सांगितले. याच काळात सुमारे दहा ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) राजस्थान सीमेवरून जप्त करण्यात आल्याचेही तो म्हणाला.बीएसएफने २०२३ मध्ये पंजाब सीमेवरून प्रामुख्याने या ड्रोननी भारतीय हद्दीत टाकलेले एकूण ४४२.३९ किलोग्रॅम हेरॉइन, विविध क्षमतेची २३ शस्त्रे आणि ५०५ काडतुसे हस्तगत केल्याचीही माहिती या अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.