Pakistan shelling near LoC: जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यात चार लहान मुलांचाही समावेश आहे. तर जवळपास ४० लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र बुधवारी झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्रता वाढली आहे.

काश्मीर खोऱ्यातील उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही गोळीबार आणि तोफगोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जम्मूतील पूंछ शहरात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाण, निवासी आणि सरकारी इमारतींवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराची तीव्रता वाढली असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात शत्रूच्या अनेक चौक्या उध्वस्त झाल्या असून पाकिस्तानातही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त पीटीआयने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूंछमधील नियंत्रण रेषेवरील बालाकोट, मेंढर, मानकोट, कृष्णा घाडी, गुलपूर, केर्नी आणि पूंछ जिल्ह्य मुख्यालयासह अनेक भागात गोळीबार झाला. या हल्ल्यात डझनभर घरे आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने चांडक, लस्साना, सनई आणि सात्रा येथे सुरक्षित व्यवस्था उभारली असून स्थानिक लोकांना तिथे हलविले आहे.

गुरुद्वारावर गोळीबार तीन जणांचा मृत्यू

जम्मूतील पूंछ जिल्ह्यात शीख बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. याठिकाणी असलेल्या गुरुद्वारावरही गोळीबार करण्यात आला आहे. या हरल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याचा निषेध केला.

गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना आज बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिले होते.