11 Killed in Madhya Pradesh Road Accident : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात रविवारी एका दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार आणि अपघातात बचावकार्य करणारा एक व्यक्ती यांच्यासह एकूण ११ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नारायणगड पोलिस स्टेशन परिसरात घडली.
रतलाम रेंज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डिआयजी) मनोज सिंग यांनी सांगितले की, या व्हॅनमध्ये १३ प्रवासी जात होते. “त्यापैकी चार जणांना वाचवण्यात आले तर नऊ जणांचा मृत्यू झाला. बचावासाठी विहिरीत उतरलेल्या मनोहर नावाच्या एका ग्रामस्थाचाही मृत्यू झाला,” असे त्यांनी सांगितले.
अपघातातील मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अद्याप विहिरीतून बाहेर काढण्यात आलेला नाही.
प्राथमदर्शनी असे दिसून येते की, दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात दुचाकी चालकाचाही मृ्त्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर युनिट्सच्या जवानांकडून बचाव कार्य केले जात आहे.
दरम्यान यावेळी मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरून विहिरीत कोसळले, असे देवदा यावेळी म्हणाले.