सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलावर शाळेच्या हॉस्टेलमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी शाळेत आलेल्या मुलाच्या पालकांना भेटायलाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी नकार दिला. अखेर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विकृत शिपायाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय घडलं नेमकं?

सतना जिल्ह्यातल्या सरस्वती विद्यापीठ उच्च माध्यमिक निवासी विद्यालयात ही गंभीर घटना घडली. शाळेचा ४३ वर्षीय शिपाई रवींद्र सेन यानं शाळेतल्या एका सातवीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर परिसरात आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा रेवा जिल्ह्याचा रहिवासी आहे. या शाळेत सातवीचं शिक्षण घेणारा हा मुलगा सहावीत असल्यापासून शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहात होता. प्रकृती बरी नसल्यामुळे हा मुलगा शाळेत न जाता हॉस्टेलवरच आराम करत असताना रवींद्र सेननं हॉस्टेलमध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शिवाय, नंतर कुणालाही घडलेला प्रकार न सांगण्याची धमकीही दिली.

मुलानं पालकांना सांगितला सगळा प्रकार

दरम्यान, रवींद्र सेनच्या धमकीला न घाबरता या मुलानं त्याच्या पालकांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलाचे पालक शाळेत आल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी व जाब विचारण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण मुख्याध्यापकांनी चक्क भेटण्यासाठी नकार दिला. शेवटी या पालकांनी थेट नजीकच्या कोलगवान पोलीस स्थानकात धाव घेतली.

पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रवींद्र सेनविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांचं एक पथक तातडीने रवींद्र सेनच्या शोधासाठी पाठवण्यात आलं. संध्याकाळी उशीरा रवींद्र सेनला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.