नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत (सीएए) बुधवारी १४ जणांना ‘नागरिकत्व प्रमाणपत्रां’चा पहिलावहिला संच देण्यात आला. तीन शेजारी देशांतील छळ झालेल्या बिगरमुस्लीम स्थलांतरितांना वादग्रस्त ठरलेल्या सीएएतील तरतुदींनुसार भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हणून संबोधले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ झालेल्या नागरिकांची दशकांची प्रतीक्षा संपली आहे, अशी प्रतिक्रियाही शहा यांनी व्यक्त केली. १४ जणांच्या अर्जांबाबतची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी १४ जणांकडे नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.

हेही वाचा >>> पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; अमित शहा यांचा विश्वास

छळ झाल्याने बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून ३१ डिसेंबर २०१४ किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिास्ती स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’ अमलात आला होता. त्याला राष्ट्रपतींची मंजुरीही मिळाली होती. परंतु ज्या नियमांनुसार भारतीय नागरिकत्व दिले जाणार होते, ते चार वर्षे उशिरा म्हणजे गेल्या ११ मार्च रोजी जारी करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिलपासून मतदानाचे टप्पे सुरू झाले. ही निवडणूक मध्यावर असताना सरकारने १४ जणांना भारतीय नागरिकत्व बहाल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील स्थलांतरित, मोदींनी वचन पूर्ण केले : शहा

धार्मिक छळामुळे तीन शेजारी देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिास्ती बंधू आणि भगिनींना भारतीय नागरिकत्व बहाल होण्यास प्रारंभ झाला आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिलेले वचन पूर्ण केले आहे. अनेक दशके हाल सोसलेल्या लोकांना न्याय आणि हक्क मिळवून दिल्यामुळे मी मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असेही शहा म्हणाले.