SpendSmart App By Shaurya Gupta: आजच्या डिजिटल युगात कागद आणि वहीची जागा मोबाईल, टॅबलेट आणि कंप्युटर व लॅपटॉपच्या स्क्रीनने घेतली आहे. आज प्रत्येकजण आपल्या विविध प्रकारच्या नोंदी आणि खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी विविध अॅप्सचा वापर करत असतो. असे असले तरी हिशोबाच्या नोदीं ठेवणारे बरेचसे अॅप्स, ते वापरण्यासाठी शुल्क आकारतात किंवा त्यामध्ये खर्चाच्या नोंदी म्यॅनुअली कराव्या लागतात.
पण, १४ वर्षांचा भारतीय वंशाचा कॅनेडियन मुलगा शौर्य गुप्ताने स्पेंडस्मार्ट हे एआयवर चालणारे आयओएस अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये पावत्या स्कॅन करून खर्चाच्या नोंदी आणि खर्चाचे व्यवस्थापन करता येते.
याचबरोबर वेळेत परतफेड करता यावी यासाठी अॅपमध्ये पावत्यांचे फोटो सेव्ह करण्याचीही तरतूद आहे. शौर्य गुप्ताने त्याने तयार केलेल्या स्पेंडस्मार्ट अॅपची एक्सवर एका डेमोसह माहिती दिली आहे. हे अॅप सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आणि ओपन सोर्स आहे. याचबरोबर यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दाखवण्यात येत नाहीत.
या स्पेंडस्मार्ट अॅपची माहिती देताना शौर्य म्हणाला की, “जर तुम्ही यापूर्वी रिसिप्ट मॅनेजर अॅप वापरले असेल, तर तुमला कदाचित माहित असेल की, त्यापैकी बहुतेक अॅप्समध्ये तुम्हाला वस्तू आणि त्याच्या किंमतीची नोंद मॅन्युअली करावी लागते. जरी काही अॅप्स पावत्या स्कॅन करत असतील तरी ते ओसीआर आणि वस्तू बहुतेकजाअचूकपणे ओळखत नाहीत.”
शैर्य गुप्ता याच्या मते, स्पेन्डस्मार्टमध्ये या दोन्ही समस्यांवर उपाय आहेत. डेमोचा भाग म्हणून, त्याने अॅप वापरणे किती सोपे आहे हे दाखवण्यासाठी लॉग इन करून दाखवले. अॅपमध्ये एकदा लॉग इन केल्यानंतर, युजर्सना न्यू एक्सपेन्सवर क्लिक करावे लागते; त्यानंतर युजर्सना पावती स्कॅन किंवा फोनच्या गॅलरीमधून पावतीचा फोटो अपलोड करता येतो. यासह पावतीचा थेट फोटो काढून तो अपलोडही करता येतो.
शौर्यने पुढे सांगितले की, “फक्त एका क्लिकवर, स्पेंडस्मार्ट आपोआप सर्व वस्तूंच्या किमतींची नोंद करत. सर्व वस्तूंचे वर्गीकरण करते आणि डॅशबोर्डवर सर्व महत्वाची माहिती भरते. जर तुम्ही यामध्ये पावत्यांचे आणखी फोटो अपलोड केले तर ते एकूण माहिती अपडेट करते, तुमची बचत दाखवते आणि तुमचा मासिक खर्चाचे विभाजन करते.”
कोण आहे शौर्य गुप्ता?
शौर्य गुप्ता हा भारतीय प्रोग्रामर आहे आणि त्याच्या ब्लॉगमध्ये तो असा दावा करतो की, त्याने तो नऊ वर्षांचा असताना कोडिंग शिकायला सुरुवात केली. त्याने Code.org आणि Scratch सारख्या ब्लॉक-आधारित प्लॅटफॉर्मपासून सुरुवात केली.
गेल्या काही वर्षांत, तो वेब डेव्हलपमेंटकडे वळला, यूट्युब आणि उडेमीसारख्या विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे तो स्वत:हून HTML, CSS आणि JavaScript शिकला. वृत्तानुसार, ११ व्या वर्षी त्याने त्याचे पहिले मॅकबुक घेतले आणि त्याने आयओएस डेव्हलपमेंट सुरू केले. तो स्वतःहून Swift आणि SwiftUI शिकला. २०२४ मध्ये, WWDC २०२४ च्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतल्यानंतर तो चर्चेत आला होता.