११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानच्या मध्य कुर्रम आदिवासी पट्टय़ातील एका मदरशामध्ये आयोजित जमियत उलेमा-आय-इस्लाम-फज्ल (जुईआय-एफ) च्या प्रचारसभेत झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण ठार, तर अन्य ७० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मध्य कुर्रम आदिवासी पट्टय़ातील साहाय्यक राजकीय प्रतिनिधी मोहम्मद फझल यांनी या स्फोटात १५ जण ठार झाल्याचे म्हटले असून यात ७० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. येथील एका मदरशामध्ये ही प्रचारसभा सुरू असताना हा बॉम्बस्फोट झाला, असे राजकीय प्रतिनिधी रियाझ मसूद यांनी म्हटले आहे.
फेडरल अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (फटा)चे माजी कायदेतज्ज्ञ ‘जुईआय-एफ’चे मुनीर खान ओर्कझाई हे या ठिकाणाहून निवडणुकीसाठी उभे असून त्यांची सभा सुरू होत असतानाच हा स्फोट झाला, असे ‘डॉन’ने म्हटले आहे.