16 year old gains height after body lengthening therapy but shrinks back in two weeks : चीनमधील एका १६ वर्षीय मुलाने सहा महिने उंची वाढवण्यासाठी थेरेपी घेतली (body lengthening therapy) आणि त्याच्या उंचीमध्ये १.४ सेंटीमीटर वाढ देखील झाली. पण हे उपचार घेणे बंद केल्यानंतर अवघ्या दोनच आठवड्यात त्या तरूणाचे शरीर पूर्वी होते त्या आकारत आले म्हणजेच आकुंचन पावले. यासंबंधी साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP)ने वृत्त दिले आहे.

फुजियान प्रांतातील शीयामेन येथील १६ वर्षीय हुआंग आडनावाच्या मुलाने चालू वर्षात फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात १६,७०० युआन (२,३५० डॉलर) खर्चून ही थेरपी घेतली. त्याच्या वडिलांनी सांगितले की यामुळे त्याची उंची ऑगस्टपर्यंत १६५ सेंटीमीटर वरून १६६.४ सेमी वाढली होती. पण जेव्हा थेरपी थांबवण्यात आली तेव्हा त्याची उंची पुन्हा १६५ सेंटीमीटर झाली.

हुआंग याच्या वडीलांनी उपचार करणाऱ्या संस्थेकडे याबाबत तक्रार केली आहे. या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना कथितपणे सांगितले की त्यांचा मुलगा हा “सुधारणा करण्यासाठी खूप मोठा झालाय” आणि त्यांनी पूर्ण पैसे परत करण्याची तयारी देखील दाखवली. मात्र वडिलांनी या संस्थेवर टीका केली असून त्यांनी हे लवकर सांगितले पाहिजे होते असे म्हटले आहे.

रिपोर्टनुसार, मुलगा दर एक ते दोन आठवड्यात एकदा उपचार घेत होता. या उपचार प्रक्रियेत पायांची स्ट्रेचिंग आणि गुडघे अॅक्टिव्हेट करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर याचा समावेश होता. हुआंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा उपचाराचे सेशव चुकवले जायेचे तेव्हा त्या मुलाची उंची कमी होत होती.

वैद्यकीय तज्ज्ञांनी ही प्रक्रिया अवैज्ञानिक असल्याचे सांगत फेटाळून लावली आहे. पेकिंग युनियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट Wu Xueyan यांनी सांगितले की, मूलभूतरित्या बळजबरीने ताणल्याने एखाद्या व्यक्तीची उंची वाढू शकत नाही. वू यांच्या मते, “एक व्यक्ती सकाळी दुपारपेक्षा अर्धा ते एक सेंटीमीटर उंच असते.” एससीएमपीच्या रिपोर्टनुसार वू यांनी यामागचे कारण देखील सांगितले. दररोज पाठीच्या कण्याचे कंप्रेशन आणि रिलॅक्सेशन यामुळे हे किरकोळ बदल होतात. “माणसे ही काही नूडल्स नाहीत. एखाद्या व्यक्तीला ताणून लांब करणे अवैज्ञानिक आहे.”

वू यांनी सांगितले की, चांगली गुणवत्ता पूर्ण झोप आणि नैसर्गिक वाढीचे घटक हेच फक्त उंची वाढवू शकतात, तसेच तुमच्या जेनेटिक्सची देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका असते असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी पालकांच्या चिंतेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा संस्थांवर टीका केली. दरम्यान या संस्थेचे नाव उघड करण्यात आलेले नाही.