भारतातून इंग्लंडमध्ये शीख धर्मोपदेशक म्हणून बेकायदेशीररीत्या आणलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या भारतीयांविरोधात स्थानिक प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या स्थलांतर घोटाळा प्रकरणात बुधवारी विविध ठिकाणच्या छापासत्रात एकूण १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
मँचेस्टर येथील शीखांचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या खालसा मिशनरी सोसायटीतील चौकशीनंतर देशभरात विविध ठिकाणी १६ पत्त्यांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
इंग्लंड प्रशासनाने बर्मिगहॅम, स्लॉग, साऊथॉल, साऊदॅम्पटन, लुटन, हन्सलो आणि लिसिस्टर आदी शहरांमध्येही स्थलांतर घोटाळ्याअंतर्गत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
बेकायदेशीर स्थलांतरित गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर इंग्लंडमध्ये मोठय़ा प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे गुन्हे तपास पथकातील निक वूड यांनी सांगितले. आम्हाला प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे ही चौकशी प्रक्रिया सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.