19 year old boy dies by suicide after being blackmailed with obscene AI generated photos of sisters : कृत्रिम बुद्धमत्तेचा (AI) वापार सध्या प्रत्येक क्षेत्रात होत आहे. पण याच्या गैरवापराची प्रकरणे देखील उजेडात आहेत. असाच काहीसा प्रकार नुकतेच समोर आला आहे. हरियाणातील एका १९ वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याने अशा घटनेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याला त्याच्या तीन बहिणींचे एआय वापरून बनवलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करण्यात आल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. डीएव्ही कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या राहुल भारती नावाच्या या विद्यार्थ्याकडे आरोपीने कथितरित्या २०००० रुपयांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास ते फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली होती.

ही घटना फरिदाबादमधील बसेलवा कॉलनी येथे घडली, जिथे राहुल आपल्या कुटुंबासह राहत होता. पीडित कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी राहुलच्या एका मित्रासह दोन व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

ब्लॅकमेलचे हे प्रकरण दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाले होते. राहुलचे वडील मनोज भारती यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलाचा फोन हॅक करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच राहुलला व्हॉट्सॲपवर त्याचे आणि त्याच्या बहिणींचे एआय-जनरेटेड मॉर्फ केलेले नग्न फोटो आणि व्हिडिओ येऊ लागले, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले.

मनोज यांनी सांगितले की वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने तो तणावाखाली होता आणि त्या अपमान सगन न करू सहन करू शकत नसल्याने तो वरचेवर एकटा राहू लागला. त्यांनी दावा केला की गेल्या १५ दिवसांमध्ये राहुलचे वागणे पूर्णपणे बदलले होते.

“त्याने व्यवस्थित जेवण करणे बंद केले, तो क्वचितच कोणाशी बोलायचा आणि पूर्णवेळ तो त्याच्या खोलीत घालवायचा,” असेही मनोज म्हणाले.

त्यांचे कुटुंब मूळ बिहार येथील अून ते फरिदाबाद येते जवळपास ५० वर्षांपासून राहात आहेत. मनोज हे ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि राहुल हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा होता. त्यांना तीन मुली आहे ज्यापैकी दोघींचे लग्न झाले आहे आणि एक अविवाहित आहे.

व्हॉट्सअॅप चॅट्समधून काय समोर आले?

राहुलचा फोन तपासला असता त्याच्या वडिलांना साहिल नावाच्या एका व्यक्तीबरोबर त्याच्या लांबच लांब व्हॉट्सअॅप चॅट्स आढळून आल्या. या चॅट्समध्ये साहिलने एआय वापरून तयार केलेले राहुल आणि त्याच्या बहि‍णींचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते आणि पैशांची मागणी केली होती.

शेवटच्या संवादात साहिलने राहुलला धमकी दिली होती खी जर त्याने पैसे दिले नाहीत तर तो हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करेल.

इतकेच नाही तर त्याने राहुलला टोमणे मारले आणि जीवन संपवण्याचे आवाहन देखील केले. त्याने राहुलला कशाप्रकारे आत्महत्या करता येईल, याबद्दल सूचनाही दिल्या आणि ज्याने मृत्यू होईल अशा काही पदार्थांचा उल्लेखही केला.

राहुलच्या वडिलांनी त्यांच्या मुलाचा एक मित्र, नीरज हा देखील यामध्ये सहभागी असू शकतो असा आरोप केला. मनोज म्हणाले की, त्यांच्या मुलाचे मृत्यूपूर्वी शेवटचे फोनवरील संभाषण हे नीरज बरोबर होते. साहिल आणि नीरज हे दोघांचाही पोलिसांच्या तक्रारीत उल्लेख आहे.