scorecardresearch

मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेची २० लाखांची फसवणूक; गेल्या महिन्याभरातील दुसरी घटना

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत महिलेला २० लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

20 lakh rs fraud with woman in gurugram
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत गुरुग्रामधील एका महिलेला २० लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३ मार्च रोजी ही घटना घडली असून गुरुग्राम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी’च्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा फेरविचार,निवडणूक आयोगासमोर सुनावणी; तृणमूल, भाकप, बसपलाही नोटीस

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्रामच्या सेक्टर ४३ मध्ये राहणाऱ्या एका महिलेला ३ मार्च रोजी एका कुरिअर कंपनीतून फोन आला. तुमचं एक पार्सल मुंबईमध्ये असून ते पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यासाठी आधार कार्डची आवश्यकता आहे, असे त्याने महिलेला सांगितले. महिलेने त्याला आधारकार्डची माहिती दिली.

काही वेळाने आणखी एका नंबरवरून महिलेला फोन आला. यावेळी चोरट्यांनी महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच आपली ओळख पोलीस उपायुक्त बलसिंग राजपूत असल्याची बतावणी केली. यावेळी त्यांनी महिलेला तीन बॅंकेची नाव सांगत तिच्या बॅंक खात्यातून मनी लॉंडरिंग झाल्याचं म्हटलं. महिलेने अशा कोणत्याही बॅंकेत खाते नसल्याचं सांगताच तिला धमकावून टप्प्या टप्याने एकूण २० लाख रुपये एका बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले.

हेही वाचा – फाशीच्या शिक्षेला पर्यायांची चाचपणी; समिती स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सूतोवाच

या प्रकरणी गुरूग्राम पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मागील काही दिवसांत अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अशाच प्रकारची एक घटना काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये उघडकीस आली होती. मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत पूर्व बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिला अकाउंटंटला सुमारे ११ लाखांनी गंडा घातला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 08:55 IST

संबंधित बातम्या