भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धात भारतीय सैन्याने आपला सर्वोच्च पराक्रम दाखवून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. कारगिल युद्धाला २० वर्ष झाली असली तरी कॅप्टन सौरभ कालिया यांच्या वडिलांचा अजूनही संघर्ष सुरु आहे. आपल्या शहीद मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी एन.के.कालिया आजही वयाच्या ७० व्या वर्षी लढा देत आहेत. कारगिल युद्धाच्यावेळी सौरभ कालिया यांच्याबरोबर जे घडले त्याने आजही अंगावर काटा उभा राहतो. पाकिस्तानी लष्कराने सौरभ कालिया यांना हालहाल करुन मारले. त्यातून पाकिस्तानी अमानुष चेहरा समोर आला.

चार जाट रेजिमेंटमध्ये अधिकारी असलेले कॅप्टन सौरभ कालिया पाच जवानांनासोबत घेऊन १४ हजार फूट उंचीवरील बजरंग पोस्ट येथे गस्त घालण्यासाठी गेले होते. १५ मे १९९९ रोजी कॅप्टन सौरभ कालिया पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांचा अमानवीय छळ केला. कॅप्टन सौरभ कालिया यांना मारण्याआधी त्यांच्या शरीरावर सिगारेटचे चटके देण्यात आले, त्यांचे डोळे काढण्यात आले. हाडे आणि दात तुटलेले होते. चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. अक्षरक्ष: हालहाल करुन त्यांना मारण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून पाकिस्तानी लष्कराचे हे क्रौर्य जगासमोर आले.

कॅप्टन सौरभ कालिया यांना पकडल्यानंतर २२ दिवसांनी ९ जून १९९९ रोजी छिन्नविछन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आला. सौरभ कालिया यांचा मृतदेह ओळखताही येत नव्हता इतके त्यांचे हाल करण्यात आले होते असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. सौरभ कालिया यांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप अजूनही पाकिस्तानने मान्य केलेला नाही. हा भारताच्या प्रचाराचा भाग आहे असे पाकिस्ताननचे म्हणणे आहे. कॅप्टन सौरभ कालिया यांचे वडिल एन.के.कालिया यांचा आजही मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

गेल्या २० वर्षात त्यांनी ५०० हून अधिक पत्रे आणि मेल पाठवले आहेत. कॅप्टन सौरभ यांचा छळ करुन पाकिस्तानने जिनेव्हा कराराचे उल्लंघन केले हे एन.के.कालिया यांना सिद्ध करायचे आहे. पण दिल्लीत सत्तेवर असलेली सरकारे पाकिस्तानकडे हा विषय मांडत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. मी जिवंत असेपर्यंत माझा संघर्ष संपणार नाही. हा फक्त माझ्या मुलाचा प्रश्न नाही. युद्धबंदी असलेल्या कैद्यांच्या अधिकाराचा विषय आहे.

कोणी पाकिस्तानला का प्रश्न विचारत नाही? माझ्या मुलाबरोबर त्यांनी जे केले ते अमानुष होते त्यानंतरही आपल्या जवानांच्या शिरच्छेदाच्या घटना घडल्या असे एन.के.कालिया म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. या २० वर्षात कालिया यांनी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मानवी हक्क संघटना, परराष्ट्र मंत्रालयाला अनेक पत्रे लिहिली आहेत. फक्त आश्वासनांशिवाय आम्हाला काहीही मिळालेले नाही असे ते म्हणाले.

माझ्या भावाला ज्या पद्धतीने त्यांनी परत केले ते मी कधीच विसरु शकत नाही. सौरभ बरोबर जे घडले ते इतर कोणाबरोबर होऊ नये. पाकिस्तानकडे हा विषय उपस्थित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. पत्र लिहिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काय मार्ग आहे? हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याबाबतीत सरकारने आता जितकी आक्रमकता दाखवली. त्यावेळी ती आक्रमकता गायब होती. आता कुटनितीक दृष्टीने आपण मजबूत आहोत. त्यावेळी अशी आक्रमकता दाखवली असती तर पाकिस्तानने सौरभ बरोबर असा अमानुषपणा केला नसता असे सौरभचे बंधू वैभव कालिया म्हणाले.