Lufthansa Airlines: लुफ्थांसा एअरलाईन्सचे एक विमान तब्बल १० मिनिटे पायलटशिवाय हवेतच असल्याचा धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. जर्मन वृत्तसंस्था डीपीएने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, कॉकपिटमध्ये असलेला एकमेव को-पायलट बेशुद्ध पडल्यानंतर १० मिनिटे विमान पायलटशिवाय हवेतच होते. ही घटना २०२४ साली घडली असून त्याबद्दलचा अहवाल आता प्राप्त झाला आहे.
१७ फेब्रुवारी २०२४ रोजी फ्रँकफर्टहून स्पेनमधील सेव्हिल येथे जाणाऱ्या एअरबस A321 चा मुख्य कॅप्टन शौचालयात गेला होता. त्यावेळी कॉकपिटमध्ये असलेला को-पायलट अचानक बेशुद्ध पडला, असा अहवाल स्पॅनिश अपघात तपास प्राधिकरणने दिल्याचे वृत्त डीपीएने दिले आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या विमानात १९९ प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. तब्बल १० मिनिटे विमान पायलटशिवाय उड्डाण करत होते. सदर अहवाल बाहेर आल्यानंतर लुफ्थांसा एअरलाईन्सची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदर अहवालाची आपल्याला कल्पना असून कंपनीच्या उड्डाण सुरक्षा विभागाने अंतर्गत चौकशी केली असल्याचे लुफ्थांसाच्या वतीने सांगण्यात आले. तरी त्यांनी त्यांचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.
डीपीएने दिलेल्या वृत्तानुसार, ऑटोपायलट यंत्रणेमुळे को-पायलटशिवाय विमान हवेत स्थिरपणे उड्डाण करत राहू शकले. को-पायलट बेशुद्ध अवस्थेत असताना कॉकपिटमध्ये मात्र विचित्र आवाज रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शौचालयातून परतल्यानंतर कॅप्टनने कोड टाकून कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. कोड टाकल्यानंतर बझर वाजला ज्यामुळे को-पायलटला आतून दरवाजा उघडावा लागतो. मात्र दरवाजा न उघडल्यामुळे कॅप्टन गोंधळला. पाच वेळा कोड टाकूनही कॉकपिटमध्ये त्याला प्रवेश करता आला नाही. शेवटी आतत्कालीन कोड वापरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना को-पायलटने आतून दरवाजा उघडला.
डीपीएने दिलेल्या वृत्तानुसार, को-पायलटची स्थिती त्यावेळी गंभीर होती. त्याने कसाबसा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यानंतर कॅप्टनने माद्रिद येथे आणीबाणीच्या परिस्थितीत विमान उतरविण्याचा निर्णय घेतला. विमान उतरल्यानंतर को-पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले.