‘टाईम’ मॅगझिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. गेल्या तीन वर्षांतील नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता पाहता, हे आकडे काहीसे आश्चर्यजनक म्हणावे लागतील. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांना यादीत आघाडीचे स्थान नव्हे तर किमान १०० जणांमध्ये तरी स्थान मिळेल का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचकांची फारशी मते मिळवू शकलेले नाहीत. त्यांना मिळालेली मते ही शून्य टक्क्यांमध्ये आहेत. मोदी यांच्या बरोबर शून्य टक्के मते मिळालेल्या सेलिब्रिटींमध्ये रॅप गायक कान्ये वेस्ट, जेनिफर लोपेझ, इवांका ट्रम्प आणि सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा समावेश आहे.

यंदाच्या ‘टाईम १०० रिडर पोल’मध्ये फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी सर्वाधिक पाच टक्के मते मिळवत आघाडी घेतली. यंदा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश असावा, यासाठी हे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी आघाडी मिळवत या यादीतील आपले स्थान पक्के केले आहे. अंतिम यादी येत्या २० एप्रिल रोजी जाहीर केली जाईल.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्युड यांनाही पाच टक्के मते मिळाली आहेत. याशिवाय पोप फ्रान्सिस, बिल गेटस आणि मार्क झुकरबर्ग यांना तीन टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन, गायक रिहाना आणि अभिनेत्री एमा स्टोन यांना दोन टक्के पसंतीची मते मिळाली आहेत.

गेल्यावर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार बर्नी सँडर्स यांनी ‘टाईम १०० रिडर पोल’मध्ये पहिले स्थान मिळवले होते. २०१५ मध्ये व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले होते.