पीटीआय, चेन्नई : २०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मळय़ाळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (फिल्म फेडरेशन) बुधवारी याबाबत घोषणा केली. निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवड समितीतील १६ सदस्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या मल्याळम चित्रपटाची एकमताने निवड केली. या चित्रपटाची निवड करण्यापूर्वी सर्व सदस्यांशी दीर्घ चर्चा केल्याचे कासारवल्ली यांनी सांगितले.
‘‘आम्ही एका आठवडय़ाच्या कालावधीत २२ चित्रपट पाहिले. त्यानंतर या चित्रपटाची निवड केली. या २२ चित्रपटांपैकी अनेक चित्रपट दर्जेदार होते. त्यामुळे हा एक कठीण निर्णय होता. प्रत्येक चित्रपटाचे विश्लेषण केल्यानंतर आम्ही ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाची निवड केली,’’ असे कासारवल्ली म्हणाले. या २२ चित्रपटांमध्ये ‘केरळ स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’, ‘गदर-२’ या हिंदी चित्रपटांसह ‘वाळवी’, ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटांचीही चर्चा झाली.
‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ चित्रपटाविषयी.
ज्युड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय लोकाचार, परिस्थिती आणि नागरिकांचे मनोविश्व यावर प्रकाश टाकतो. हा चित्रपट २०१८ मध्ये केरळला आलेल्या आपत्तीबद्दल बोलतो. मात्र केवळ भारताचेच नव्हे तर जगभरात घडत असलेल्या आपत्तीचेही प्रतिनिधित्व करतो. चित्रपट सिनेमॅटिक आणि तांत्रिकदृष्टय़ाही उत्कृष्ट आहे, अशी माहिती गिरीश कासारवल्ली यांनी दिली. हा चित्रपट हवामान बदल आणि तथाकथित विकासकामांबाबतही भाष्य करतो, असे ते म्हणाले. टोविनो थॉमस या अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.