अमेरिकेच्या लेविस्टन शहरांत अंदाधुंद गोळीबार झाला असून यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली असून त्यांनी सिटी कॉन्सलर रॉबर्ट मॅकार्थी यांच्याशी संपर्क साधला होता. या हल्ल्यात ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर, लेविस्टन पोलीस लेफ्टनंट डेरिक सेंट लॉरेंट यांनी एनबीसी या वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, गोळीबार बॉलिंग अॅलेतील स्पेयरटाइम रिक्रिएशन आणि स्कीमेंजीस बार व ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये झाला.

मेन स्टेट पोलीस आणि काउंटी शेरीफ यांनी बुधवारी रात्री एक शूटर सक्रिय असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, लागलीच हा हल्ला झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले असून नागरिकांनी दरवाजे बंद करून घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरिफच्या कार्यालयाने संशयित शूटरचा फोटोही जारी केला असून तो फरार आहे. जारी केलेल्या फोटोमध्ये संशयित आरोपीच्या हातात रायफल दिसत आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोराला पकडण्यात आले नसल्याने आणखी हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज, लेविस्टनमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जो बायडेन यांना दिली माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या घटेनची माहिती देण्यात आली असून तेही या घटनेत गांभीर्याने लक्ष घालत असल्याची माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे. हल्ला झालेली दोन स्थाने एकमेकांपासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे.

हल्लेखोराच्या गाडीचा फोटो जारी

पोलिसांनी एका पांढऱ्या वाहनाचा फोटोही शेअर केला असून, त्याचा पुढचा बंपर काळ्या रंगाचा असल्याचे सांगितलं आहे. ज्यांना ही गाडी ओळखीची असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी जारी केलेल्या व्यक्तीचं नाव रॉबर्ट कार्ड असं असून त्याचा मूळ फोटोही पोलिसांनी शेअर केला आहे. त्याच्याकडे शस्त्र असल्याने त्याच्यापासून लोकांना धोका आहे. त्यामुळे याच्याविषयी कोणालाही काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबार झालेल्या ठिकाणी नागरिकांना व्यवसाय बंद ठेवून पोलिसांना तपासाला सहकार्य करण्याचे शेरीफच्या कार्यालयाने म्हटलं आहे. मेन डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या प्रवक्त्याने रहिवाशांना त्यांचे दरवाजे बंद करून घरात राहण्याचे आवाहन केले आहे. तर, गोळीबाराच्या दोन ठिकाणी पोलीस तपास करत आहेत.