Moradabad​ News : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांत सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणीने स्वत:चं जीवन संपवलं आहे. तसेच या २२ वर्षीय तरुणीने स्वत:चं जीवन संपवण्याच्या आधी एक व्हिडीओ बनवला असून त्यामध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी सासरे आणि पतीसह सासरच्या लोकांना जबाबदार धरलं आहे.

या तरुणीने टोकाचं पाऊल उचलण्याच्या आधी बनवलेल्या व्हिडीओमध्ये तिने पती आणि सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अमरीन असं तिचं नाव असून ती व्हिडीओमध्ये असं म्हणत आहे की, “माझ्या मृत्यूनंतर माझं काय होईल हे मला माहित नाही. पण माझे सासरे, माझी वहिनी आणि काही प्रमाणात माझा नवरा माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. हे लोक माझा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.”

दरम्यान, या तरुणीने व्हिडीओमध्ये असंही म्हटलं आहे की, “गर्भपात झाल्यानंतर तिचे आयुष्य आणखी नरकमय झालं होतं. कधीकधी माझ्या सासरचे लोक घरची वीज खंडित करायचे. कधीकधी ते माझ्या खाण्याच्या सवयींवर टीका करायचे, तर कधी माझा अपमान करायचे. नेहमीच मला आणि माझ्या पतीला काही ना काही चूक दाखवून दिली जायची. तसेच सर्व जण म्हणायचे की तू मरत का नाही? माझा नवराही मला म्हणायचा की तू का मरत नाहीस? तुला वाचवून आम्ही चूक केली”, असे गंभीर आरोप या तरुणीने केले आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

वृत्तानुसार, या तरुणीने स्वत:चं जीवन संपवण्याआधी तिच्या वडिलांना कॉल करून मदत मागितली होती. ती मला वाचवा, हे लोक मला मारतील, असं म्हणाली होती. मात्र, तिचं माहेरचं कुटुंब सासरच्या घरी पोहोचेपर्यंत तिने जीवन संपवलं होतं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमरीनचा पती बंगळुरूमध्ये काम करतो, तर ती स्वतः तिच्या सासऱ्यांच्या घरी राहत होती. तिच्या मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये तिने असंही म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून ती खूप अस्वस्थ होती आणि गर्भपात झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांकडून तिचा सतत छळ होत होता, असाही आरोप तिने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.